नाशिक : अंबड व सिडको परिसरातील नागरिकांना मोबाइलवर फोन करून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन संशयिताने सुमारे पावणे पाच लाख रुपये आॅनलाइन पद्धतीने काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
अंबड पोलीस ठाण्यात रामबिक्स रामशंकर प्रजापती (रा. संजीवनगर, चुंचाळे शिवार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ७ डिसेंबर २०१६ रोजी संशयिताने प्रजापती यांना बँकेतून बोलत असल्याचे सांगून फोन केला व एटीम वा डेबिट कार्डची संपूर्ण माहिती जाणून घेतली़ यानंतर या संशयिताने आणखी काही नागरिकांना फोन करून त्यांच्याकडूनही सर्व माहिती घेऊन वेगवेगळ्या दिवशी आॅनलाइन पद्धतीने ४ लाख ७२ हजार १५६ रुपये परस्पर काढून घेतले़
या प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांच्या काही दिवसांपूर्वीच हा प्रकार लक्षात आला असता त्यांनी अंबड पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची फिर्याद दिली़ या प्रकरणी प्रजापती यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़