मालेगावातील आठ गावे होणार ‘स्मार्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 05:45 PM2018-12-09T17:45:49+5:302018-12-09T17:46:47+5:30
दाभाडी क्लस्टर : शहरांप्रमाणेच गावांनाही पायाभूत सुविधा देण्याच्या योजनेंतर्गत दाभाडी क्लस्टर तयार करण्यात आले असून त्यातील आठ गावे ही ...
दाभाडी क्लस्टर : शहरांप्रमाणेच गावांनाही पायाभूत सुविधा देण्याच्या योजनेंतर्गत दाभाडी क्लस्टर तयार करण्यात आले असून त्यातील आठ गावे ही ‘स्मार्ट’ होणार आहेत. या गावांच्या विकासासाठी ग्रामविकास आराखड्यात घेण्यात आलेल्या कामांमध्ये स्वच्छता, घरकुल आणि पाणीपुरवठ्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आलेले आहे.
ग्रामीण भागातील गावांच्या समूहाचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करणे तसेच शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविणे हा श्यामाप्रसाद मुखर्जी ‘रूरबन’ अभियानाचा मुख्य उद्देश आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टर मधील आठ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या क्लस्टरमध्ये दाभाडी, पिंपळगाव, रावळगाव, जळगाव, बेळगाव, तळवाडे, पांढरून, धवळेश्वर या आठ गावांच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. या गावांमध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, पथदिवे, जनसुविधा अंतर्गत प्रस्तावित कामे, जलयुक्त शिवार, आरोग्य, शिक्षण कृषीविकासाच्या योजना, कौशल्य विकास, घरकूल योजनांची कामे केली जाणार आहेत. यातील काही कामांना प्रारंभदेखील झाला आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन तसेच भूमिगत गटार यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
या क्लस्टरमधील गावांच्या शाळा डिजिटल करण्यावरदेखील भर देण्यात आला असून, आठवडे बाजार संकल्पना कायम ठेवताना बाजारात सुविधा पुरविण्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे.