नाशिक : शेतजमीन कसत असल्याचा खोटा करारनामा तयार केल्यानंतर त्यावर वृद्ध जमीनमालकाच्या खोट्या सह्या व अंगठ्या करून जमीन हडपण्याच्या उद्देशातून सातबारा उताऱ्यावरील पिकपेरा सदरी नाव लावून फसवणूक करणा-या औरंगाबाद व सातारा येथील दोघा संशयितांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
काशिनाथ सोनार (८३, गिते वाडा, रविवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात असलेल्या मौजे हरसूल येथील गट नंबर ७९ मध्ये पाच एकर जमीन आहे. संशयित प्रमोद वसंत दाभाडे (रा. वाई, जि. सातारा) व दिगंबर विश्वनाथ गोटे (रा. खिरेगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांनी जमीन हडप करण्याच्या उद्देशाने संगनमत करून दिगंबर गोरे यास २१ नोव्हेंबर २०१४ ते २१ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत प्रतिएकर पाच हजार रुपये वर्षाप्रमाणे कसण्यास दिली असा इंग्रजीमध्ये खोटा करारनामा (नोटरी) नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय आवारातील अॅड़ शेख यांच्याकडे २५ नोव्हेंबर २०१४ रोजी तयार करून घेतला.
यानंतर संशयित गोटे व दाभाडे यांनी या करारनाम्यावर सोनार यांच्या खोट्या सह्या व अंगठे देऊन शेतजमिनीच्या सातबारा उता-यावरील पिकपेरा सदरी नाव लावून घेतले़ हा प्रकार लक्षात येताच सोनार यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन या दोघा संश्यितांविरोधात फसवणूकीची फिर्याद दिली़