नाशिक : खरेदी झालेल्या जमिनीचा बनावट साठेखत करारनामा करून त्या कागदपत्रांद्वारे न्यायालयात दावा दाखल करून जमीनमालकाची फसवणूक करणाऱ्या सहा संशयितांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
समीर कुरेशी (रा़ बागवानपुरा, जुने नाशिक) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार जमीनमालक संशयित संदीप लामखेडे यांच्याकडून पंचवटी भागातील सर्व्हे नंबर १५७/३ यातील प्लॉट नंबर १ क्षेत्र ९३४़५ चौरस हेक्टर २७ एपिल २०१५ रोजी ८० लाख रुपयांना खरेदी केले़ मात्र जमीनमालक संदीप लामखेडेसह संशयित शंकर वडजे, छाया कुलथे, ए. शेख ,आर. बकरे व सुनील म्हैसधुणे या सहा संशयितांनी कट रचून बनावट कागदपत्रांच्या आधारे न्यायालयात दावा दाखल करून फसवणूक केली़ प्लॉटचे बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी संशयित छाया कुलथे यांनी बनावट मुद्रांक पुरविले तर संशयित एक़शेख याने नोटरी केली़ या नोटरीवर संशयित आऱ बकरे व सुनील म्हैसधुणे यांनी साक्षीदार म्हणून सह्या केल्या़ संशयित लामखेडे यांनी हा प्लॉट शंकर वडजे यांना ५५ लाख रुपयात व्रिकी करावयाचा असून १५ लाख रुपये दिल्याचा बनावट साठेखत करारनामा ३१ डिसेंबर २०१४ रोजी तयार केल्याचे दाखविले़
या संशयितांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करून दस्तऐवज बनावट असताना त्याचा वापर न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी करून फिर्यादी कुरेशी यांची फसवणूक केल्याचे नाशिकरोड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़