नाशिक : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकांचे अन्न-धान्यावाचून हाल होऊ नये, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रदान केल्याची माहिती, अन्न नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून सर्व प्राप्त लाभार्थ्यांना रेशनचे धान्य मिळेल याची काटेकोरपणे काळजी घ्यावी. तसेच दुकानात काळाबाजार व साठेबाजी होणार नाही याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष देणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे काही जिल्ह्यात मोफत तांदूळ वाटपाचे काम सुरू असून, हळूहळू संपूर्ण राज्यात मोफत तांदूळ वाटपाचे काम करण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी कळविले आहे.पुरवठा विभाग, महसूल व पोलीस विभागाने समन्वय साधून काम करावे. आपण लोकांची सेवा करण्यासाठी घराच्या बाहेर आहोत. राज्यात कुठेही अन्नधान्याचा तुटवडा होणार नाही व सामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहनही त्यांनी केले.सोशल डिस्टन्स व लॉकडाउनमुळे इतर कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु रेशनिंग, पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पोलीस, आरोग्य विभागाची यंत्रणा, औषधे, किराणा, भाजीपाला दुकानदार, शेतकरी, महावितरण ही सर्व यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून काम करीत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी, पुरवठा अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 1:51 PM