नाशिक : शहरासह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडू लागल्याने अशा बाधित रुग्णांच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या रुग्णांची संख्या ६५५ इतकी असून, या सर्वांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे, त्यात सर्वाधिक संख्या मालेगाव महापालिका हद्दीत आहे.नाशिक शहरासह मालेगाव, येवला, चांदवड, निफाड, सुरगाणा, सिन्नर या तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोणाच्या तरी संपर्कात आल्यावर या आजाराची लागण होत असल्यामुळे ते टाळण्यासाठी किंबहुना त्याचा प्रचार व प्रसार होऊ नये म्हणून ज्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे, अशा व्यक्तीच्या जवळचे नातेवाईक, मित्र तसेच आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना अतिजोखमीचे रुग्ण म्हणून संबोधित करून त्यांच्यावर उपचार, विलगीकरण करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत १४८ रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहेत, अशा रुग्णांच्या संपर्कात आलेले २८ ठिकाणचे ६५५ लोक अतिजोखमीचे आहेत. यातील प्रत्येक व्यक्तीचे नमुने घेतले जात असून, त्यांनाही रुग्णाप्रमाणे १४ दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. आजवर सापडलेले कोरोनाबाधित हे अतिजोखमीचे रुग्ण म्हणूनच दाखल होते, त्यांचे रिपोर्ट आल्यावर तेदेखील बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. येवल्यात सापडलेले पाच रुग्ण त्याच प्रकारातून उघडकीस आले आहेत. अतिजोखमीच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या मालेगाव शहरातील आहे. जवळपास १५ ठिकाणी अतिजोखमीच्या रुग्णांचा वावर झाला आहे. ही सर्व ठिकाणे सीलबंद करण्यात आली असून, कमी जोखमीच्या रुग्णांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे.नाशिक शहरात गोविंदनगर, गंगापूररोड, नाशिकरोड, सातपूर ही ठिकाणे अतिजोखमीच्या रुग्णांची घोषित आहेत. याशिवाय लासलगाव, चांदवड, सिन्नर, येवला येथेही आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.
नाशिक जिल्ह्यात ६५५ अतिजोखमीचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 6:05 PM