येवल्यात ४६ आरोग्य पथकांमार्फत तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 06:10 PM2020-04-27T18:10:00+5:302020-04-27T18:13:49+5:30

नाशिक : जिल्ह्यातील येवला व सुरगाणा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कामाला लागला असून, कोरोनाचा प्रादुर्भाव ...

nashik,inspection,by,health,teams,in,yeola | येवल्यात ४६ आरोग्य पथकांमार्फत तपासणी

येवल्यात ४६ आरोग्य पथकांमार्फत तपासणी

Next
ठळक मुद्देआरोग्य विभाग कामाला; घरोघरी होणार सर्व्हे



नाशिक : जिल्ह्यातील येवला व सुरगाणा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कामाला लागला असून, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वैद्यकीय पथकामार्फत घरोघरी सर्वेक्षण सुरू झाले आहे. एकट्या येवला शहरात ४६ पथकांमार्फत गेल्या तीन दिवसांपासून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यात प्रथमच निफाड तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता, त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली होती. कोरोनाला अटकाव करण्यासाठीचा पुरेसा अनुभव नसतानाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, तत्कालीन आरोग्य अधिकारी दवल साळवे यांनी रातोरात कोरोनाबाधित रुग्णाच्या गावाची चोहोबाजूंनी नाकाबंदी केली व त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, नातेवाईक, हितचिंतक या सर्वांना खबरदारी म्हणून तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले, त्याचबरोबर सुमारे ५० वैद्यकीय पथकांमार्फत संपूर्ण गावातील १४०० कुटुंबाची घरोघरी जाऊन तपासणी केली, त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यास मोठा हातभार लागला. गावात अन्य दुसरा रुग्ण सापडू शकला नाही. हा पॅटर्न यशस्वी झाल्याने सिन्नर, चांदवड या ठिकाणीदेखील अशाच प्रकारे कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश मिळाले. मात्र येवल्यात एक महिला कोरोनाबाधित सापडल्यानंतर आरोग्य विभाग कार्यवाही करण्याच्या तयारीत असताना आणखी पाच रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामुळे रविवारी रात्रीपासून आरोग्य विभागाने येवल्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. महत्त्वाचे म्हणजे सापडलेले पाच कोरोनाबाधित हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अतिजोखमीचे रुग्ण म्हणून आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून होते. आता या पाच व्यक्तींच्या संपर्कात कोण होते याचा शोध घेण्यासाठी ४६ पथके तैनात करण्यात आली आहेत.

Web Title: nashik,inspection,by,health,teams,in,yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.