नाशिक : सकाळची थंड हवा अन् बासरीच्या सुमधूर स्वरांसोबत शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे वरीष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि शहरवासिय हे सर्व गुरुवारी (दि़२१) योगसाधनेत लीन झाले होते़ निमित्त होते जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर लोकमत, नाशिक शहर पोलीस आयुक्तालय व योग क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग शिबिराचे़
पोलीस आयुक्तालयातील बराक नंबर सतरासमोर आयोजित करण्यात आलेल्या या योग शिबिरामध्ये योग क्रीडा प्रबोधिनीचे डॉ. प्रेमचंद जैन यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आसनांची प्रात्यक्षिके आणि माहिती साधकांना देण्यात आली. शिबिराची सुरुवात मानेच्या हालचालीने झाल्यानंतर स्कंध संचलन, मेरूदंड संचलन, जानू संचलन तसेच दंडस्थिती, बैठकस्थिती, शयनस्थिती आदि आसनांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. डॉ. प्रेमचंद जैन यांनी साधकांना मार्गदर्शन करताना प्रत्येक आसन कसे करायचे, आसन करताना कुठली काळजी घ्यायची यांसह आसनांपासून मिळणारे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भारतीय संस्कृतीत योग साधनेला विशेष महत्त्व असून, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचा विशेष फायदा होत असून योग ही साधना असून ती आयुष्यभर करावी असा सल्ला जैन यांनी दिला़
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या महापौर रंजना भानसी यांनी ‘लोकमत’ने योगदिनी राबविलेल्या या विशेष उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या, तसेच योग साधनेत सातत्य राखण्याचे आवाहन केले. ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी प्रास्ताविकात योग साधनेला समारोप नसतो, ही साधना अखंडितपणे सुरू ठेवावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महापौर रंजना भानसी, पंचवटीचे माजी प्रभाग सभापती तथा नगरसेवक अरुण पवार, पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे, अशोक नखाते, विजयकुमार चव्हाण,भागवत सोनवणे, मोहन ठाकूर व पोलीस अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आले़ लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांच्या हस्ते योगसाधनेवरील पुस्तके देऊन प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले़ यावेळी उपस्थित साधकांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या योग शिबिरास वरीष्ठ पोलीस अधिकारी, महिला व पोलीस कर्मचारी, लहान मुले यांचा विशेष सहभाग होता.योगाबरोबरच हास्ययोगहीपोलीस मुख्यालयातील बराक नंबर १७ समोर झालेल्या या योग शिबिरात आनंद हास्य क्लबचे अॅड. वसंतराव पेखळे आणि योग शिक्षकांनी हास्ययोगाचे सादरीकरण केले. ‘लय भारी, लय भारी, लय भारी है’ यापासून हास्ययोगाची सुरुवात झाली, तसेच ‘नको औषध नको गोळ्या, हसत हसत वाजवा टाळ्या’ याप्रकारे विशिष्ट टाळ्या वाजवून हास्ययोग व व्यायाम यांची सांगड असलेली प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यानंतर ‘ब्रेन वॉशिंग’, ‘टेन्शन रिलीज’ यांच्या प्रात्यक्षिकांसह दीर्घश्वसनाच्या अभ्यासाबाबत साधकांना मार्गदर्शन करण्यात आले़