नाशिक : घरातील कोणालाही न सांगता निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या पाच तासात शोध लावला आहे़ वडाळा गाव परिसरातील या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केल्यानंतर त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत़
वडाळागावातील अण्णाभाऊ साठे परिसरातील अल्पवयीन मुलगी शनिवारी (दि़१३) दुपारी घरातील कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती़ आई-वडीलांनी परिसरात रात्रीपर्यंत शोध घेतला मात्र त्यांना मुलगी सापडली नसल्याने त्यांच्या काळजी वाढली होती़ अखेर रविवारी (दि़१४) पहाटे पाच वाजता मुलीच्या आईवडीलांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन कायदेशीर फिर्याद दिल्याने अज्ञात संशयिताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला़
इंदिरानगरचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी सहायक पोलीस निरीक्षक जगताप यांना मार्गदर्शन करून मुलीच्या शोधासाठी दोन पथके तयार केली़ पोलीस कर्मचारी राम जाधव, टोपले व राऊत यांच्या पथकास त्र्यंबकेश्वर येथे तर दुसºया पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोहित शिंदे, दत्तात्रय पाळदे संदीप लांडे, सागर पाटील यांना शहरातील निर्जन स्थळी तपासासाठी पाठविण्यात आले़ सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगी तपोवनातून शंकरनगरकडे येत असल्याचे गुन्हे शोध पथकास दिसले़
मुलीच्या आई-वडीलांनी दिलेल्या वर्णनाची मुलगी हीच असल्याचे पोलिसांच्या पथकास लक्षात आले, त्यांनी या मुलीला ताब्यात घेऊन इंदिरानगर पोलीस ठाण्यात आणून आई-वडीलांच्या स्वाधीन केले़ गुन्हे शोधक पथकाने अवघ्या पाच तासात अल्पवयीन मुलीचा शोध घेतल्याने वरीष्ठांनी अभिनंदन केले आहे़