पंचवटी : गत आठवड्यात म्हसरूळजवळील बोरगड (एकतानगर) येथील नितीन दिलीप परदेशी या युवकाच्या खुनाचे कारण शोधण्यास म्हसरूळ पोलिसांना यश आले आहे. संशयित मयूर जाधव व परदेशी यांच्यात आर्थिक वाद झाला होता त्या वादातूनच परदेशीचा डोक्यात गोळी झाडून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल जप्त केले आहे.
एकतानगरमधील सातीआसरा मंदिराजवळच्या लोखंडी बाकावर बसलेल्या नितीन परदेशी या युवकावर बुधवारी (दि.६ जून) रात्रीच्या सुमारास संशयितांनी गोळी झाडली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या परदेशीचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी मखमलाबाद लिंकरोडवरील वेदश्री सोसायटीत राहणारा विजयकुमार पुंडलिक गांगोडे, मयूर राजाभाऊ जाधव (रा़ जुई, एकता अपार्टमेंट, एकतानगर) व हितेश ऊर्फ चिक्या रवींद्र केदार (वेदांत अपार्टमेंट, चाणक्यपुरी) या तिघांना अटक केली़
पोलिसांनी केलेल्या चौकशीत मयत नितीन परदेशी याने काही दिवसांपूर्वी संशयित मयूर जाधव याची शेवरलेट कंपनीची कार भुसावळला नेली होती़ या गाडीचा परदेशी याच्याकडून अपघात झाल्याने ती चारचाकी भुसावळला जमा असून, परदेशी याने जाधवकडून काही रक्कम घेतली होती. अपघातात जमा असलेली कार सोडविण्यासाठी तसेच घेतलेले पैसे परत द्यावे यासाठी संशयित जाधव याने गेल्या अनेक दिवसांपासून परदेशीकडे तगादा लावला होता़ मात्र, परदेशी पैसे देत नसल्याने दोघांत वाद झाले होते.
बुधवारी (दि.६ जून) रात्री संशयित व मयत नितीन परदेशी यांनी एकतानगरला मद्यपान केले़ यानंतर काहीवेळाने परदेशी हा लोखंडी बाकावर एकटाच बसल्याची संधी साधून संशयितांनी हातातील गावठी पिस्तुलातून परदेशी याच्या डोक्यात गोळी झाडल्याची कबुली दिली़ पोलिसांनी या खुनातील संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूलही जप्त केले आहे.