नाशिक : सातपूरच्या कामगारनगरजवळ रिलायन्स पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने आलेल्या चौघा संशयितांनी पेट्रोलपंपावरील कामगारास जबर मारहाण करून त्याच्याकडील रक्कम लुटल्याची घटना शुक्रवारी (दि़९) मध्यरात्री घडली होती़ यातील मधुकर नंदू खोपे (२२, रा. संत कबीरनगर झोपडपट्टी, भोसला स्कूल मागे नाशिक ) या एका संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे़
रिलायन्स पेट्रोल पंपावर शुक्रवारी रात्री साडेबारा ते पाऊण वाजेच्या सुमारास अर्जुन ताकतोडे हा रात्रपाळीत काम करीत असताना पांढºया रंगाची अॅक्टिवा दुचाकी ढकलत संशयित आले़ त्यांनी पेट्रोलच्या कारणावरून वाद घालून ताकतोडे यास मारहाण केली व खिशातील १९ हजार ५०० रुपयांची रक्कम बळजबरीने काढून घेत पसार झाले़ या प्रकरणी चौघांविरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेच्या युनिट दोनने या घटनेप्रसंगीचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता यातील एक संशयित गंगापूर रोड परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस शिपाई योगेश सानप यांना मिळाली़ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, पोलीस नाईक देवकिसन गायकर, पोलीस शिपाई बाळा नांद्रे, जयंत शिंदे, मधुकर साबळे यांच्या पथकाने कॉलेजरोड परिसरात सापळा रचून संशयित खोपेस अटक केली.
या गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून तीन साथीदारांसमवेत हा गुन्हा केल्याची कबुली खोपे याने पोलिसांकडे दिली आहे़