नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयातर्फे विविध क्षेत्रांतील २२ कर्तृत्ववान महिला, अधिकारी व कर्मचा-यांना ‘तेजस्विनी’ पुरस्कार देऊन त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात आला़ पोलीस मुख्यालयातील बॅरेक नंबर १७ मध्ये पोलीस आयुक्त डॉ़रवींद्रकुमार सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली व लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या फिचर एडिटर तथा लेखिका अपर्णा वेलणकर या कार्यक्रमास प्रमुख अतिथी होत्या़
वेलणकर यांनी पूर्वी व आताच्या महिलांमधील सामाजिक बदलांबाबत भाष्य केले़ तसेच मुलींना ज्याप्रमाणे किशोरवयातील शारीरिक बदलाबाबत माहिती देतो त्याचप्रमाणे मुलांनाही द्यायला हवी, असे सांगितले़ या पुरस्कार वितरण समारंभानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली़
पोलीस आयुक्त सिंगल व प्रमुख अतिथी अपर्णा वेलणकर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे, श्रद्धा नलमवार (नेमबाज), दीप्ती राऊत (पत्रकार), शोभा पवार (सामाजिक कार्यकर्त्या), लीला जोजारे (प्रशासकीय अधिकारी), अर्चना खेतमाळीस-गोरे (तहसीलदार), लक्ष्मी जाधव (फळविक्रेते), मीराबाई अहिरे (मोचीकाम), मानिनी देशमुख (परिचारिका), गौरी खैरनार, किरण खरे, अबोली लहामगे (पेट्रोलपंप कर्मचारी), नंदा जाधव, सुनीता संगमनेरे (अंशकालीन कर्मचारी), ज्योती डोके, विमल अहेर, संगीता चव्हाण (सफाई कर्मचारी), एम़ आऱ दातीर (लेखा शाखा), मनीषा सोनार (आस्थापना), आऱ एम़ जगताप (पत्रव्यवहार शाखा), मुस्कार खान, प्रियंका एखंडे (सायबर अॅम्बेसिडर) तसेच महिला पोलीस अधिकारी व कर्मचा-यांना तेजस्विनी पुरस्काराने गौरविण्यात आले़
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपआयुक्त माधुरी कांगणे यांनी केले़ पोलीस निरीक्षक नम्रता देसाई यांनी आभार मानले़ यावेळी महापौर रंजना भानसी, पोलीस उपआयुक्तविजय मगर, श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह शांती राधाकृष्णन, स्नेहल कोकाटे, मनाली पाटील, श्रद्धा भुजबळ, सुजाता चव्हाण, शारदा नखाते तसेच सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते़
कार्यक्रमांची सांगताशहर पोलीस आयुक्तालयातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते़ या कार्यक्रमांची सांगता महिला दिनी करण्यात आली़ सकाळच्या सत्रात पोलीस आयुक्तालयात शूटिंग स्पर्धा, डोळे तपासणी शिबिर, आर्ट व क्राफ्ट प्रदर्शन असे कार्यक्रम घेण्यात आले़