आनलाइन परीक्षा झाल्यास ग्रामीण भागात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 06:40 PM2020-04-27T18:40:51+5:302020-04-27T18:44:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : लॉकडाउनमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यातच दि. ३ मेनंतर आणखी लॉकडाउन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : लॉकडाउनमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यातच दि. ३ मेनंतर आणखी लॉकडाउन वाढविल्यास परीक्षा कधी होणार याकडे सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. त्यातच महाविद्यालय व विद्यापीठ पातळीवर परीक्षा आनलाइन पद्धतीने घेतल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल, असे काही विद्यार्थी व प्राध्यापकांचे म्हणणे आहे. कारण ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेटची समस्या असते. नेटवर्क नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना आॅनलाइन परीक्षेपेक्षा आॅफलाइन परीक्षा अधिक सोयीची वाटते. परंतु आता लॉकडाउन वाढल्यास नेमक्या परीक्षा केव्हा होणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. तसेच अनेक महाविद्यालयांचा अभ्यासक्रम अपूर्ण असून, काही ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्राध्यापक विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाबाबत मार्गदर्शन करीत आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांना यात सहभाग घेण्यास अडचणी येत आहेत. विशेषत: गावाकडे गेलेल्या विद्यार्थ्यांना नेटवर्कच उपलब्ध नसल्याने इंटरनेटच्या माध्यमातून प्राध्यापकांशी संपर्क होत नाही. त्यामुळे लॉकडाउन संपल्यानंतर प्रत्यक्ष (आॅफलाइन) पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण व्हावा मगच परीक्षा घ्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून होत आहे.
राज्यातील अन्य विद्यापीठांतर्गत महाविद्यालयामार्फत आॅनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेण्यात आली असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मात्र अद्याप आॅनलाइन परीक्षेबाबत निर्णय झालेला नसल्याचे समजते. दरम्यान, शिक्षण विभाग, विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूमिकेनंतर परीक्षेबाबत नेमका काय निर्णय होतो हे कळणार आहे.