लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लॉकडाउनमुळे शहरातील सर्व दुकाने बंद असली तरी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मात्र सुरू आहेत. त्यामुळे लाल मिरची विक्रीची दुकानेदेखील सुरू असून, मागील वर्षीपेक्षा यंदा सर्वच प्रकारच्या मिरचीचे दर वाढल्याने तिखट चटणी बनविणाऱ्या गृहिणींना आर्थिक फटका बसत आहे.उन्हाळ्यात दरवर्षी लाल मिरचीची बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर आवक होते. मिरची प्रामुख्याने नंदुरबार, धुळे, नगर, जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतून येते. सिडको- अंबड लिंक रोडवर त्रिमूर्ती चौक, दत्त मंदिर चौक भागात लाल मिरचीचे ढीग लागलेले दिसतात. नंदुरबारची संकेश्वरी मिरची प्रसिद्ध आहे. यावर्षी पाऊस पुरेसा झाल्यामुळे मिरचीचे पीक चांगले आले आहे. परंतु त्यानंतर बेमोसमी पावसामुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात नाशिक शहरात मिरचीची आवक सुरू झाली त्यावेळी दरही कमी होते. मात्र मार्चमध्ये संचारबंदीमुळे बाहेरच्या जिल्ह्यातून होणारी मिरचीची आवक रोडावली. साहजिकच दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गृहिणी सध्या मोजकीच मिरची खरेदी करीत आहेत. मसाला व लोणच्यासाठी लागणारी मिरची नंतर खरेदी करण्याचा गृहिणींचा कल दिसतो.सध्या काश्मिरी मिरची ३५० रुपये, जळगाव फाफडा २२५ रुपये, नंदुरबार चपाटा २६० रुपये, संकेश्वरी २७० रुपये, रसगुल्ला मिरची ४५० रुपये, तडका मिरची ५१० रुपये असे मिरचीचे दर आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदा ५० ते ७० रुपयांपर्यंत मिरचीचे दर वाढले आहेत. महिनाभरानंतर मालाची आवक वाढल्यास दर कमी होतील, असे विक्रेत्यांनी सांगितले.
लाल मिरचीचा ग्राहकांना बसतोय तिखट झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 1:37 PM