नाशिक : अतिशय अवघड व खडतर अशा मलेशिया येथील लंकावी येथे झालेली ‘आयर्न मॅन २०१८’ स्पर्धा शहरातील चेतन अग्निहोत्री यांनी शनिवारी (दि. १७) जिंकली. या स्पर्धेसाठी जगभरातून दोन हजार चारशे स्पर्धक आयर्न मॅन-२०१८ हा किताब पटकावण्यासाठी सहभागी झाली होते. विशेष म्हणजे अग्निहोत्री यांनी स्पर्धेचा निर्धारित वेळ १६ तासांऐवजी १५ तास १० मिनिटांमध्येच ही स्पर्धा पूर्ण करून देशाची मान उंचावली.मलेशियामध्ये गेल्या अनेक वर्षे आयर्न मॅन स्पर्धेचे आयोजन केले जात असून, यामध्ये जगभरातील स्पर्धक सहभाग घेतात. अत्यंत खडतर व अवघड असलेली ही स्पर्धा १६ तासांमध्ये पूर्ण करावयाची असते. या स्पर्धेत प्रथम चार किलोमीटर पोहणे (स्विमिंग), १८० किलोमीटर सायकलिंग, ४२ किलोमीटर धावणे (रनिंग) या तीनही स्पर्धा १६ तासांमध्ये पूर्ण कराव्या लागतात. मात्र शरणपूररोडवरील एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट विभागाचे व्यवस्थापक अग्निहोत्री यांनी १५ तास १० मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण करून ‘आयर्न मॅन’ किताब पटकावला आहे. मलेशिया वेळेनुसार शनिवारी (दि. १७) सकाळी ८ वाजता सुरू झालेली ही स्पर्धा रात्री १२ वाजता संपली.चेतन अग्निहोत्री यांनी वयाच्या ४३व्या वर्षी अतिशय खडतर असलेला आयर्न मॅन हा किताब पटकावला आहे. नाशिक येथून केवळ अग्निहोत्री हे एकमेव स्पर्धक होते.नाशिक शिरपेचात मानाचा तुराअग्निहोत्री यांनी ही स्पर्धा १५ तास १० मिनिटात पूर्ण केली. यापूर्वी २०१५ मध्ये सुप्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण तर २०१८ मध्ये पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी ही स्पर्धा पूर्ण केली होती. आयर्न मॅन २०१८ ही स्पर्धा चेतन अग्निहोत्री यांनी जिंकल्याने नाशिकच्या शिरपेचात पुन्हा एकदा मनाचा तुरा खोवला गेला आहे. अग्निहोत्री यांना पुण्याचे कौस्तुभ रहाळकर यांनी प्रशिक्षण दिले.
नाशिकचे चेतन अग्निहोत्री ठरले ‘आयर्न मॅन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:19 AM