नाशिक- पिंपळगाव बसवंत येथील निफाड नाशिक-फाटा परिसरात लागलेल्या भीषण आगीत जवळपास पंधरा ते सोळा दुकानं जळून खाक झाली आहेत. रात्री दोनच्या सुमारास लागलेली आग सकाळी आठच्या सुमारास नियंत्रणात आली. नाशिक,ओझर, पिंपळगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणली. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. आगीचं कारण समजू शकलेलं नाही. या आगीत पंधरा ते सोळा दुकानं जळून खाक झाली असून त्यात कापड, भांडी, भंगार, चप्पल-बूटांसह काही मिठाईच्या दुकानांचादेखील समावेश आहे. मध्यरात्री दोनच्या सुमारास लागलेल्या आगीनं क्षणार्धात रौद्र रूप धारण केल्यानं स्थानिकांची धावपळ उडाली. यानंतर या परिसरात आरसीएफ जवानांचं पथक तैनात करण्यात आलं. पिंपळगाव येथील मध्य वस्तीतल्या मुख्य रस्त्यावर आग लागल्यानं शेकडो लोकांनी गर्दी केली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच ठिकाणी १९८८ मध्येही आग लागली होती. त्यात २५ दुकानं खाक झाली होती.
नाशिकमध्ये भीषण आग; १६ दुकानं जळून खाक झाल्यानं मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 8:33 AM