प्रत्येक शहराची आपली म्हणून एक ओळख असते, ती जपतानाच कर्तबगारीचे वा वैशिष्ट्यपूर्णतेचे नवनवीन टप्पे पार पडतात तेव्हा त्यातून ही ओळख अधिक विस्तारते. मंत्रभूमी ते यंत्रभूमीपर्यंतच्या प्रवासाचे असे टप्पे ओलांडणाºया नाशिकने क्रीडाविश्वात जी देदीप्यमान घोडदौड चालविली आहे, तीही अशीच या शहराची ओळख विस्तारणारी असून, नाशिककरांना मोठ्या प्रमाणावर लाभलेल्या मानाच्या शिवछत्रपती पुरस्कारांनी त्यावर शिक्कामोर्तबच घडून आले आहे.क्रीडा क्षेत्रातील सेवा-कार्यासाठी राज्य शासनातर्फे देण्यात येणाºया शिवछत्रपती पुरस्कारांत १७ नाशिककर क्रीडापटू व मार्गदर्शकांचा समावेश असणे ही समस्त जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. खरे तर एकूण तीन वर्षांसाठीचे पुरस्कार एकाचवेळी घोषित झाल्याने ही संख्या मोठी झाली. पण, त्यामुळे सर्व क्रीडा प्रकारातील तारे एकाचवेळी चमकून गेल्याने नाशिकच्या अवघ्या क्रीडाविश्वाचा गौरव अधोरेखित होऊन गेला आहे. तीन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा व त्यांचे वितरणही एकाचवेळी होणे ही तशी दप्तर दिरंगाईचीच बाब. राजकारणाच्या धबडग्यात क्रीडासारख्या कौशल्याधारित क्षेत्राकडे होणारे दुर्लक्षच यातून स्पष्ट होणारे आहे. परंतु तसे असले तरी विविध क्रीडा प्रकारात जिल्ह्याचे नाव देश आणि जागतिक पातळीवर नेऊन पोहचविणाºया व त्यासाठी साहाय्यभूत ठरणाºयांची दीपमाळच जणू पुढे आल्याने त्यातून क्रीडानगरीची नवीन ओळख प्रस्थापित करता येणार आहे. विशेष म्हणजे, नाशिकने आजवर क्रिकेटसाठी दोन डझनापेक्षा अधिक रणजीपटू दिले आहेत. अॅथलेटिक्समध्ये कविता राऊत व रोर्इंगमध्ये (नौकानयनात) दत्तू भोकनळ यांनी आॅलिम्पिकपर्यंत पोहोचून नाशिकचा झेंडा फडकविला आहे. लहानगा विदित गुजराथी आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवून बुद्धिबळात ‘ग्रॅण्ड मास्टर’ ठरला आहे. नाशिकमध्ये ‘मॅरेथान कल्चर’ तर खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नाशिक रन, लोकमत, पोलीस खाते, मराठा विद्याप्रसारक समाज संस्था आदींतर्फे आयोजिल्या जाणाºया ‘मॅरेथॉन्स’मुळे आरोग्यविषयक जागरूकता तर वाढली आहेच, शिवाय अॅथलेटिक्सला प्रोत्साहन मिळून जाते आहे. क्रिकेटमध्येही जिल्हा क्रिकेट असोसिएशनने चांगले काम उभे केले असून, राज्यातल्या १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंचा सराव सामन्यांचे नियोजन आदींची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली गेल्याची बाब या क्षेत्रातील त्यांचे भरीव कार्य स्पष्ट करणारी आहे. क्रिकेटमध्येच ‘लोकमत’च्या नाशिक प्रीमिअर लीग (एनपीएल)च्या माध्यमातूनही स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. ‘लोकमत एनपीएल’ने दिमाखदार आयोजनाचा वस्तुपाठ घालून देत वेगळी उंची गाठून दिली. क्रिकेटसाठीच रासबिहारी चषक स्पर्धाही नियमितपणे होतात. नाशिक महापालिकेतर्फे घेतल्या जाणाºया महापौर चषक स्पर्धा मध्यंतरी बंद झाल्या होत्या, यंदापासून त्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. कबड्डीसारख्या देशी खेळासाठी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेनेही भव्यदिव्य आयोजन केले. अन्यही अनेक संस्था सातत्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करीत असतात. नाशकातल्या स्व. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाºया अश्वमेध क्रीडामहोत्सवाचाही यासंदर्भात आवर्जून उल्लेख करता येणारा आहे. नौकानयनासाठी नाशिकच्या ‘मविप्र’चे बोट क्लब चांगले सरावाचे ठिकाण बनले आहे. गेल्यावेळी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा तेथे झाल्या. प्रख्यात क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ स्व. भीष्मराज बाम यांच्या प्रयत्नातून सातपूरच्या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाची शूटिंग रेंज तयार झाली आहे. जलतरण, सायकलिंग, तलवारबाजी, बुद्धिबळ, शरीरसौष्ठव आदी विविध क्रीडा प्रकारातही नाशिकच्या क्रीडापटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत धडक दिली आहे. थोडक्यात, व्यायामशाळा व मल्लखांब, कुस्तीपासून सुरू झालेले नाशकातील क्रीडा कौशल्य आता जवळपास सर्वच क्रीडा प्रकारात भरभराटीस आलेले व नावाजताना दिसत आहे. मोठ्या संख्येने लाभलेले शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार ही त्याचीच पावती ठरावी. मंत्र व तंत्र भूमीबरोबरच फुलांपासून कांदा-द्राक्षांच्या निर्यातीपर्यंत, वाइनपासून मिसळ हबपर्यंत विस्तारलेली नाशिकची ओळख त्यामुळे क्रीडानगरीपर्यंत नेता येणारी आहे.