तुझ्यात जीव रंगला मालिकेतील ‘त्या’ संवादांवर शिक्षक संघटना नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:36 AM2018-01-25T00:36:26+5:302018-01-25T00:39:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : एका दूरचित्रवाहिनीवरील मराठी मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ यातील शिक्षकांसंदर्भात उच्चारण्यात आलेले शब्द आणि विद्यार्थिनीबरोबर प्रेमप्रकरण याप्रसंगाबाबत राज्यातील शिक्षक संघटनांकडून सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या मालिकेमुळे शिक्षकांची प्रतिमा मलिन होत असल्याची पोस्ट शिक्षकांच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये फिरत आहे. या मालिकेविषयी निषेधदेखील व्यक्त केला जात आहे.
या मराठी मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणाºया व्यक्तिरेखाच्या तोंडी शिक्षकांबद्दल आक्षेपार्ह शब्दप्रयोग करण्यात आलेले आहेत. ‘मास्तरडे, मास्तरिन, दीडदमडीचे मास्तरडे, मास्तुरड्या असे शब्द प्रत्येक भागात उच्चारले जात असल्याने शिक्षकांचा हा अवमान असल्याच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करण्यात आल्या आहेत. घराघरात आणि शहरापासून खेड्यापर्यंत टिव्हीवरील मालिका पाहिल्या जातात. याचा लहान मुलांच्या मनावर तसेच समाजावरदेखील परिणाम होत असतो. अलीकडच्या काळात तर टीव्हीवरील कार्यक्रम पाहून शालेय विद्यार्थी त्याचे अनुकरण करीत असतात. अशा अनेक घटना यापूर्वीच समोर आल्या आहेत. मुलांपर्यंत शिक्षकांविषयीचे असे शब्द शिक्षकांचा अवमान करणारी ठरत आहे.
मालिकेत शिक्षकांसंदर्भात वापरण्यात आलेले शब्द आणि काही भागांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थिनीचे दाखविण्यात आलेले प्रेमप्रकरण यामुळे शिक्षकांची प्रतिमा मलिन होत असल्याने या प्रकाराला आळा घालावा यासाठी शिक्षक संघटनांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करतानाच याविरोधात आवाज उठविण्याची भूमिका घेतली आहे. शिक्षकांविषयी आदर निर्माण करण्याची आवश्यकता असताना त्यांच्याविषयी अनादर निर्माण होईल किंवा हेच संवाद सातत्याने विद्यार्थ्यासमोर येत राहिल्यास विद्यार्थी मनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता शिक्षकवर्गाने व्यक्त केली आहे. शिक्षकांच्या सोशल मीडियावरील ग्रुपमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात लवकरच जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी शिक्षण अधिकाºयांना निवेदने देऊन मालिकेतील आक्षेपार्ह संवादावर कात्री लावण्याची मागणी केली जाणार आहे.