स्मार्ट सिटीची साडेतीनशे कोटींची कामे सुरू करण्यासाठी चाचपणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 03:15 PM2020-04-27T15:15:06+5:302020-04-27T15:16:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे महापालिकेची कोट्यवधी रुपयांची कामे रखडली होती. त्यातील सुमारे शंभर कोटी रुपयांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे महापालिकेची कोट्यवधी रुपयांची कामे रखडली होती. त्यातील सुमारे शंभर कोटी रुपयांची कामे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता स्मार्ट सिटी कंपनीच्या रखडलेल्या साडेतीनशे कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्याबाबतदेखील हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे गावठाण विकास आणि प्रोजेक्ट गोदाची कामे लवकरच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या महिन्यात केंद्र शासन आणि राज्य शासनाने लॉकडाउन आणि संचारबंदी लागू केली. त्यामुळे खासगी आणि शासकीय अशी सर्वच कामे थांबली आहेत. नाशिक महापाालिकेच्या कोट्यवधी रुपयाची कामे रखडली आहेत. किमान सातशे ते आठशे कोटी रुपयांची कामे थांबल्याने महापालिकेला भविष्यात मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तथापि, २० एप्रिलनंतर राज्य शासनाने काही उद्योग आणि व्यवसायाबाबत शिथिलता दिल्यानंतर महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काही कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण विभागाची सुमारे शंभर कोटी रुपयांची कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पावसाळापूर्व गटारी साफ करणे आणि अन्य कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य कामे सुरू करण्यात येणार आहेत. याच धर्तीवर स्मार्ट सिटी कंपनीची रखडलेली सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची कामेदेखील सुरू होण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने गावठाण विकासाची २४१ कोटी रुपये, तर प्रोजेक्ट गोदाच्या पहिल्या टप्प्यातील ११० कोटी आणि गोदावरी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटची दहा कोटी अशी सुमारे ३६० कोटी रुपयांची कामे रखडली
आहेत. यातील प्रोजक्ट गोदा आणि आणि गावठाण विकासाअंतर्गत रस्त्याची कामे सुरूदेखील झाली होती. मात्र ही कामे बंद पडली होती. आता महापालिका लवकरच ही कामे सुरू करण्याची शक्यता आहे.