वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील ५० बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 04:34 PM2018-01-14T16:34:49+5:302018-01-14T16:38:33+5:30
नाशिक : वडाळा-पाथर्डी परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने रविवारी (दि़१४) कारवाई केली़ सुमारे सहा तास सुरू असलेल्या या मोहिमेत सुमारे ५० रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली असून, या कारवाईची माहिती मिळाल्यामुळे की काय या रस्त्यावरील रिक्षाचालक गायब झाले होते़

वडाळा-पाथर्डी रस्त्यालगतच शिवाजीवाडी, विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, कलानगर, सार्थकनगरसह विविध उपनगरे आहेत़ या उपनगरांमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक राहत असले तरी लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्य तितक्या बसफे-या होत नाही़ त्यामुळे शालिमार ते पांडवनगरी या वडाळा-पाथर्डी रस्त्यावर सुमारे ६० ते ७० रिक्षा चालतात़ या रिक्षांमध्ये पाठीमागील सीटवर सहा ते सात आणि चालकाशेजारी दोन ते तीन प्रवासी अशी अवैध व धोकादायक प्रवासी वाहतूक केली जात असल्याची नागरिकांची तक्रार होती़
शहर वाहतूक पोलीस विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले व कर्मचा-यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन गणवेश परिधान न करणारे, वाहन परवाना नसणारे तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणा-या पन्नास रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली़ वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी समाधान पवार, शंकर दातीर, कानिफनाथ मोटकर, गोकूळ वाबळे यांचा या पथकात समावेश होता़
कायमस्वरूपी मोहीम
साईनाथनगर चौफुली, सावरकर चौक व सार्थकनगर बस थांब्यासमोरील बेशिस्त रिक्षाचालकांवर शहर वाहतूक पोलिसांच्या पथकाने कारवाई केली़ तसेच रस्त्यावर उभ्या राहणा-या विक्रेत्यांच्या गाड्याही हटविण्यात आल्या असून, ही मोहीम कायमस्वरूपी राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधिका-यांनी सांगितले़