नाशिक : इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा वाढता वापर आणि त्यामुळे प्रदूषणात झालेली चिंताजनक वाढ लक्षात घेता इलेक्ट्रानिक्स वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स वाहन खरेदीपासून ते अगदी पार्किंगपर्यंतचा विचार करून वाहनधारकाला अनेक सवलती देण्याची योजना आखण्यात आली आहे. या संदर्भात परिवहन मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवून इलेक्ट्रॉनिक्स वाहनांच्या प्रोत्साहनासाठीचे पर्याय सुचविले आहेत.पर्यावरणाचे बिघडणारे संतुलन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या ग्लोबल वॉर्मिंगचा धोका जगापुढील मोठी समस्या आहे. पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून अनेक उपाययोजनांंवर मंथन झालेले आहे. त्यातील अनेक योजनांना मूर्तस्वरूप प्राप्त होत असून, प्रदीर्घ कालावधीतील संशोधन, अभ्यास आणि चर्चा, प्रयोगातून इलेक्ट्रॉनिक्स वाहनाविषयी जागरूकता आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. जागतिक पातळीवर तर अनेक उपाययोजना सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून इलेक्ट्रॉनिक्स वाहनांचा पर्याय समोर आला आहे. अनेक देशांमध्ये प्रत्यक्ष अशी वाहने रस्त्यावर धावतदेखील आहेत.भारतातही आता इलेक्ट्रॉनिक्स वाहनांच्या वापराबाबतची जनजागृती होण्यास प्रारंभ झाला असून, ही जाणीव अधिक जागृक करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी परिवहन मंत्रालयाकडूनच अनेक बाबींवर विचार करण्यात आला असून, त्यासाठीचे एक पाऊलदेखील पुढे टाकण्यात आले आहे. देशात इलेक्ट्रॉनिक्सवाहनांच्या वापरास प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र सरकारने अशा वाहनांच्या खरेदीवर सवलत देण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स वाहनांना टोलमध्ये सवलत तसेच पार्किंगमध्येदेखील सवलत देण्याबाबत निर्णय झालेला आहे. याबरोबरच सदर गाडी इलेक्ट्रॉनिक्स असल्याचे लक्षात येण्यासाठी गाडीची नंबर प्लेट ही हिरव्या रंगाची असणार आहे. त्यावर पांढºया रंगात गाडीचा क्रमांक लिहिला जाणार आहे.अर्थात इलेक्ट्रॉनिक्स वाहनाच्या वापराबाबत अपेक्षित जागरूकता किंवा ग्राहकांचा कल नसल्याने पहिल्या टप्प्यात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहे. असलेल्या सवलती कायम ठेवून अधिकाधिक ग्राहकाभिमुख योजना करण्यासाठीदेखील प्रयत्न केले जाणार आहे.
इलेक्ट्रॉनिक्स वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 5:56 PM