राष्ट्रवादीची मागणी : विभागीय आयुक्तांना निवेदन शेतमालाला हमीभाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:18 AM2018-03-11T00:18:42+5:302018-03-11T00:18:42+5:30
नाशिकरोड : शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा आदी मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त राजाराम माने यांना देण्यात आले.
नाशिकरोड : केंद्रात व राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या शासनाने शेतकरीविरोधी धोरण अवलंबिले आहे. शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीमालाला हमीभाव द्यावा आदी मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त राजाराम माने यांना देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या उत्तर महाराष्ट्र विरोधी भूमिकेच्या निषेधार्थ नाशिक येथे हल्लाबोल संघर्ष यात्रेच्या समारोपानिमित्त सभा ठेवण्यात आली होती. दरम्यान शनिवारी दुपारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांची राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, आमदार जयंत जाधव, रवींद्र पगार, श्रीराम शेटे, गजानन शेलार, रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे आदींच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी तटकरे साडेतीन वर्षांत दुष्काळ, अतिवृष्टी, गारपिटीसारखे संकट आले. यामध्ये शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असूनही शासनाने शेतकºयांना कोणतीही मदत दिली नाही. बोंड अळीमुळे कापूस उत्पादक पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असूनही शासनाने उत्तर महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांची खिल्ली उडविली आहे. तसेच बेरोजगारी वाढल्याने तरुणांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे. तर महागाई दिवसेंदिवस वाढत असूनही शासन ढिम्मपणे बसले असून काहीच करत नसून जनतेच्या भावनांची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी तटकरे यांनी यावेळी केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य शासनाने राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानात दिवसेंदिवस भ्रष्टाचार वाढत असून, सरकार कोणतीच चौकशी करीत नाही. बीड जिल्ह्यात जलयुक्तमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे काही अधिकाºयांना निलंबित केले आहे. मात्र सरकारने केवळ बीड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात जलयुक्त शिवार अभियानात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला. यावेळी दिलीप बनकर, नाना महाले, अर्जुन टिळे, विष्णुपंत म्हैसधुणे, मनोहर कोरडे, दीपक वाघ, चैतन्य देशमुख, अंबादास खैरे, वैभव देवरे, गौरव गोवर्धने, निवृत्ती कापसे, दिलीप बनकर, वसीम शेख, प्रशांत वाघ, दौलत त्रिभुवन, प्रेरणा बलकवडे आदी उपस्थित होते.