नाशिक- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सहकार खात्याने सोमवारी (दि.२२) प्रशासक नियुक्त केले खरे मात्र, त्याची शाई वाळण्याच्या आतच तुषार पगार या सदस्याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता प्रशासक समितीच्या कारभारावरच प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.
ज्येष्ठ सनदी लेखापाल तुषार पगार यांनी मंगळवारी (दि.२३) सहकार आयुक्तांना पत्र पाठवले असून त्यात सदस्यपदी नियुक्ती करून आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभार मानले आहेत. मात्र,पूर्वनियोजीत व्यावसायिक आणि कौटूंबिक प्राधान्यक्रमामुळे आपण बँकेच्या कामास सध्या वेळ व न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे प्रशासक समितीतून आपले नाव वगळावे अशी विनंती पगार यांनी केली आहे. एखाद्या विशीष्ट विषयात बँक प्रशासनाला माझ्याकडून काही कामाची गरज भासली तर तर त्यासाठी आपण उपलब्ध राहू असे त्यात पगार यांनी नमूद केले आहे.
गैरव्यवहार आणि आर्थिक व्यवहारातील अनिमयीतता यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ २०१७ मध्ये रिझर्व बँकेने प्रशासक मंडळ बरखास्त केले आणि प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले होते. मात्र, त्यावेळी संचालक मंडळाने उच्च न्यायालयात जाऊन रिझर्व बँकेच्या कारभारास स्थगिती आणली हेाती. आता गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने अंतिम सुनावणी झाली आणि त्यात रिझर्व बँकेचे आदेश कायम केल्याने अखेरीस हे संचालक मंडळ बरखास्त केले आहे. त्यामुळे प्रशासक समितीचा मार्ग मेाकळा झाला. सोमवारी (दि.२२) सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी तीन सदस्यीय प्रशासकीय सदस्यीय समिती गठीत केली. सहकारी सोसायटींचे सहसचिव एम. ए. अरिफ यांच्या अध्यक्षतेखालील समितीत उप निबंधक चंद्रशेखर बारी आणि सनदी लेखापाल तुषार पगार यांची सदस्यपदी नियुक्ती केली होती. पगार यांनी जुन्या पिपल्स को ऑप बँकेचे प्रशासक म्हणून काम केले आहे.
मंगळवारी (दि.२३) या पैकी अरिफ आणि बारी यांनी दुपारी कार्यभार स्विकारला मात्र, तुषार पगार यांनी सहकार आयुक्तांना पत्र पाठवले असून त्यात आपले नाव वगळण्याची विनंती केली असल्याने त्यांनी मात्र पदभार स्विकारला नाही.