कोरोनामुळे गुळाच्या चहाचा नवा ट्रेंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:05+5:302021-07-18T04:11:05+5:30
चांदोरी : शहरासह ग्रामीण भागात साखरेची मागणी आता कमी होत असून, पावडर गुळाची मागणी वाढत आहे. सध्या रसायनविरहित गूळ ...
चांदोरी : शहरासह ग्रामीण भागात साखरेची मागणी आता कमी होत असून, पावडर गुळाची मागणी वाढत आहे. सध्या रसायनविरहित गूळ उपलब्ध होत असल्यामुळे साखरेपेक्षा गूळ भाव खात आहे. गूळ हा आरोग्यासाठी साखरेपेक्षा उपयुक्त मानला जातो. गुळामध्ये असलेल्या आयुर्वेदीय गुणांबाबत आता कोरोनाच्या काळात गुळाच्या चहालाही लोक पसंती देऊ लागले आहेत. पूर्वी गुळाची ढेप दहा किलोची आणि त्यापेक्षा जास्त वजनाची होती. पण, आता ग्राहकांची मागणी लक्षात घेता गूळ उत्पादकांनी गुळाच्या ढेपमध्ये बदल करत सध्या पाच किलो, एक किलो, दोन किलो आणि त्यापेक्षा छोट्या ढेपमध्ये रूपांतर केले आहे. त्यामुळे लहान ढेपांची मागणी वाढत आहे. सध्या केमिकलविरहित आणि पावडर अशा विविध प्रकारांमध्ये गूळ बाजारात उपलब्ध असले तरी याचे दर गुळापेक्षा जवळपास दुप्पट असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक हे पावडरपेक्षा गुळाच्या ढेपची मागणी करत आहेत. सध्या ग्रामीण भागात चहा विक्री करणारे स्पेशल गुळाचा चहा विक्री करत आहेत. त्यांच्याकडे साखरेच्या चहापेक्षा गुळाच्या चहाची मागणी जास्त असून, त्याची किंमतदेखील अधिक आहे. गुळाच्या चहाला गरिबांचा चहा म्हणून हिणवले जात होते, मात्र आता अनेक जण गुळाचा चहा घेण्यासाठी अग्रेसर आहेत. आरोग्याबद्दल जागरूक असलेले अनेक नागरिक हा गुळाचा चहा घेतात, तर घरातील गोड खाद्यपदार्थांमध्येदेखील गुळाचा वापर केला जाताना दिसतो. गूळ हा उष्ण आहे. साखरेत ग्लुकोज, तर गुळात फ्रुक्टोज असते. गूळ साखरेपेक्षा नक्कीच आरोग्यदायी असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
कोट... लोखंडाच्या पाटामध्ये तयार केलेल्या गुळाला गुऱ्हाळाचा गूळ म्हटले जाते. अशाप्रकारे तयार केलेल्या गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते व इतर प्रकियेने तयार केलेल्या गुळामध्ये लोहाचे प्रमाण त्या मानाने कमी असते. लोह, रक्तवाढीसाठी गूळ फायदेशीर असतो. - डॉ. सुमंत दीक्षित