निफाड नगर पंचायतीस उत्तेजनार्थ पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 11:01 PM2021-06-05T23:01:36+5:302021-06-06T00:14:16+5:30
निफाड : माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत नगर पंचायत गटात निफाड नगर पंचायतीस उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
निफाड : माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत नगर पंचायत गटात निफाड नगर पंचायतीस उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
निफाड नगर पंचायतीच्या वतीने मोठ्या स्वरूपात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात आली होती. या खताचा वापर वृक्षारोपणासाठी करण्यात आला. त्याचप्रमाणे ओला व सुका कचरा साठवण्यासाठी नागरिकांना डस्टबीनचे वाटप करण्यात आले होते. त्याचप्रमाणे नागरिकांसाठी रांगोळी, पोस्टर, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दर बुधवारी सायकल रॅलीचे शहरात आयोजन करण्यात येत होते.
विना इंधन वाहनांच्या जनजागृतीसाठी इलेक्ट्रिकल व्हेइकल कॅम्प घेण्यात आला होता. शहरात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले होते, त्याचप्रमाणे पर्यावरण व स्वच्छतेच्या दृष्टीने इतर विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याची दखल घेत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी निफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे, नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके, नगर अभियंता भालचंद्र क्षीरसागर, कार्यालयीन अधीक्षक हर्षवर्धन मोहिते, लेखापाल नितीन भवर, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता भाग्यश्री सोनवणे व नगर पंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
निफाड नगर पंचायतीला हे पारितोषिक मिळाले याचा मनस्वी आनंद वाटला. या स्पर्धेचे उपक्रम यशस्वी करण्यासाठी निफाड नगर पंचायतीचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. कोरोनाच्या ५ महिन्यांच्या कठीण काळात आम्ही पर्यावरण, स्वच्छता याबाबत जे उपक्रम राबवले यात नागरिकांचे मोठे सहकार्य मिळाले. २०२१- २२ यावर्षीच्या या स्पर्धेसाठी आम्ही अधिक चांगले यश मिळवण्याचा प्रयत्न करू.
- डॉ. श्रीया देवचके, मुख्याधिकारी, नगर पंचायत, निफाड.