श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथील संत श्री निवृत्तिनाथ संस्थानवरील पदाधिकाऱ्यांची नियुक्तीचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर मागील सर्व पदाधिकारी हे वारकरी महामंडळाच्या माध्यमातून नियुक्त झालेले आहेत. सर्व पदाधिकारी व अध्यक्ष नियुक्ती वारकरी महामंडळाच्या सहमतीनेच झालेली आहे. शासनाला आताही हा नियुक्तीचा तिढा सोडवायचा असेल तर वारकरी महामंडळाला विश्वासात घेऊनच प्रक्रिया राबवून विश्वस्त नेमावेत. तरच तिढा सुटून मंदिर विकासाचा मार्ग सुकर होईल. संत श्री निवृत्तिनाथ मंदिर विश्वस्त निवडीवर भाष्य करताना वारकरी महामंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष हभप रामेश्वर महाराज शास्री यांनी हे विचार व्यक्त केले आहेत. गेल्या महिनाभरात १८८ उमेदवारानी रितसर अर्ज करून, मुलाखती देऊनही निवडप्रक्रिया रद्द करणे हा लोकशाही कायद्याचा अवमान आहे. राज्यातील कुठल्याच तीर्थक्षेत्रात असा पेच आतापर्यत उद्भवलेला पाहायला मिळाला नाही. श्री क्षेत्र पंढरपुर, देहु, आळंदी, पैठण, मेहुण, सासवड, मुक्ताईनगर, शिर्डी, सप्तश्रृंगी गड आदी ठिकाणी पदाधिकारी निवड अडचण आलेली नाही. मग संत श्री निवृत्तिनाथांनाच हा वनवास का? बाकी सगळे मंदिर बांधकामे पुर्ण झालेली आहेत. पण संत निवृत्तिनाथ महाराज विश्वस्त निवड व मंदिर बांधकाम हे मुद्दे गेली अनेक वर्षे चर्चेचा कळीचा मुद्दा बनत चालला आहे. तरी हा प्रश्न लवकर मार्गी लागावा यासाठी सर्वच वारकरी बंधु-भगिनींनी सहकार्य करावे, असेही आवाहन हभप रामेश्वर महाराज शास्री यांनी केले आहे.
(फोटो ११ शास्त्री)