नाशिक : वसंत व्याख्यानमालेला तीन लाख रुपयांचे अनुदान देण्यावरून वाद सुरूच असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अनुदान नाही; पण सहकार्य म्हणून वक्ते मात्र देऊ शकतो, असा हात पुढे केला आहे.वसंत व्याख्यानमालेला गेल्यावर्षी महापालिकेने अनुदान मंजूर करूनदेखील तीन लाख रुपये देण्यात आले नाही. त्यामुळे व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी महापालिकेकडे तगादा लावला होता. व्याख्यानमालेतील आर्थिक व्यवहाराचे वाद धर्मादाय आयुक्तांपर्यंत पोहोचल्याने आणि त्याबाबत महापालिकडे तक्रारी करण्यात आल्याने माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनुदान रोखले होते. विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यांचाच निर्णय कायम ठेवल्याने श्रीकांत बेणी यांनी महापालिकेसमोर उपोषण केले आणि त्यानंतर ते समाप्त करतानाच आयुक्त गमे यांचा मोबाइल क्रमांकदेखील व्हायरल करून त्यांना फोन करून अनुदान देण्यास सांगा, असे आवाहन केले होते. या प्रकारामुळे आयुक्तांनी आपण अत्यंत व्यथित झाल्याचे सांगितले. आर्थिक कारणामुळे जर वक्ते मिळत नसतील तर व्यक्तिगत पातळीवर दोन चांगले वक्तेच व्याख्यानमालेला विनामूल्य उपलब्ध करून देण्याची तयारीही गमे यांनी बेणी यांच्याकडे व्यक्त केली होती. राज्यात माधव गोडबोले यांच्यासारखे अनेक चांगले माजी सनदी अधिकारी असून, त्यांचे व्याख्यान ठेवता येऊ शकेल, असे गमे यांचे म्हणणे होते. यापूर्वी उस्मानाबाद येथेदेखील त्यांनी गोडबोले यांच्यासह काही माजी सनदी अधिकाऱ्यांची व्याख्याने ठेवली होती. त्यामुळे याच धर्तीवर त्यांनी नाशिकमध्येही मदत देऊ केली होती. दरम्यान, अशाप्रकारचे दूरध्वनी क्रमांक व्हायरल करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करताना त्यांनी आपल्याला आलेले बहुतांशी फोन स्वीकारले.वसंत व्याख्यानमाला गेल्यावर्षीच संपली आहे, त्यामुळे आता गेल्यावर्षीसाठी अनुदान देण्याची गरज काय, असा प्रश्न आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी त्यांना अनुदानासाठी फोन करणाऱ्यांना केला तसेच अडचणीदेखील सांगितल्या.आणि संबंधितांना व्याख्यानमालेला अनुदान का दिले नाही हे पटवून दिल्याने फोन करणाऱ्यांच्या शंकांचे समाधान झाल्याचे ते म्हणाले.
अनुदान नको, व्याख्याता देतो! मनपा आयुक्तांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 1:03 AM
वसंत व्याख्यानमालेला तीन लाख रुपयांचे अनुदान देण्यावरून वाद सुरूच असून, त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अनुदान नाही; पण सहकार्य म्हणून वक्ते मात्र देऊ शकतो, असा हात पुढे केला आहे.
ठळक मुद्देवसंत व्याख्यानमाला : मोबाइल क्रमांक व्हायरल केल्याने नाराज