मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:19 AM2021-06-16T04:19:28+5:302021-06-16T04:19:28+5:30
नाशिक: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लाॅकडाऊन व निर्बंध शिथील ...
नाशिक: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लाॅकडाऊन व निर्बंध शिथील करण्यात आल्याने लांब पल्ल्याच्या सर्वच रेल्वे आरक्षण तिकीट हाऊसफुल्ल आहे. जवळपास सर्वच रेल्वेचे आरक्षण तिकीट वेटिंगवर आहे.
देशात व राज्यात दीड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातल्याने रेल्वे प्रशासनाकडून सर्वच पॅसेंजर दर्जाच्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत तसेच लांब पल्ल्याच्या महत्त्वाच्या रेल्वे सुरू ठेवलेल्या आहेत. राज्यांतर्गत येणाऱ्या जाणाऱ्या अनेक रेल्वेदेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. रेल्वेमध्ये आरक्षण कन्फर्म तिकिटाशिवाय प्रवास करता येत नाही. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायचे असेल आणि त्या राज्याने आरटीपीसीआर अहवाल बंधनकारक केला असेल तर संबंधित प्रवाशाला ७२ तास अगोदरचा अहवाल प्रवासादरम्यान सोबत बाळगणे गरजेचे आहे. रेल्वेच्या जनरल बोगीतून जरी प्रवास करायचा असेल तरी आरक्षण घ्यावेच लागत आहे.
--इन्फो--
आपल्या जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख रेल्वे
१) मंगला एक्स्प्रेस
२) पंजाब मेल
३) राजधानी एक्स्प्रेस
४) मुंबई-हावडा एक्स्प्रेस
५) कलकत्ता मेल
६) गीतांजली एक्स्प्रेस
७) विदर्भ एक्स्प्रेस
८) देवगिरी एक्स्प्रेस
९) तपोवन एक्स्प्रेस
१०) राज्यराणी एक्स्प्रेस
--इन्फो--
सर्वाधिक वेटिंग ‘राजधानी’ला
नाशिकहून राजधानी एक्स्प्रेसचे आरक्षण तिकीट काढणे कठीण झाले आहे. या गाडीला मोठ्या प्रमाणात आरक्षण केेले जात आहे. आठवड्यातून तीन दिवस राजधानी एक्स्प्रेस नाशिक रोड रेल्वेस्थानकातून जाते.
--इन्फो-
एसीचेही वेटिंग
सर्वच लांब पल्ल्याच्या रेल्वेचे वातानुकुलित बोगीचे आरक्षण तिकीट हाऊसफुल्ल आहे सद्य:स्थितीत सर्वच लांब पल्ल्याच्या रेल्वेचे आरक्षण तिकीट वेटिंगवर आहे.
--इन्फो--
पॅसेंजर कधी सुरू होणार
कोरोनामुळे सर्वच पॅसेंजर रेल्वे रद्द करण्यात आलेल्या आहेत. या रेल्वे गाड्या कधी सुरू होतील याबाबत अद्याप निश्चित माहिती रेल्वे प्रशासनाकडे देखील उपलब्ध नाही. साधे तिकीट बंद असल्याने जोपर्यंत साधे तिकीट सुरू होत नाही तोपर्यंत पॅसेंजर दर्जाच्या रेल्वे सुरू होणार नाही, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
--इन्फो--
नांदेड मार्गावर प्रवासी मिळेनात
नांदेडकरीता असलेल्या तपोवन एक्स्प्रेसला अपेक्षित प्रवासी मिळत नसल्याचे एकूणच चित्र आहे. मात्र, गाडी पुढच्या मार्गावर प्रवासी मिळत जातात असा दावा देखील रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. तपोवन एक्स्प्रेसला नाशिक, इगतपुरी, कल्याण, येथून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता परंतु आता या गाडीला पूर्ण क्षमतेने प्रवासी मिळेनात, अशी परिस्थिती झाली आहे. अपवादात्मक परिस्थितीत मात्र गाडीला चांगला प्रतिसादही मिळतो.