नाशिक : महापालिकेच्या वतीने विविध संस्थांना अनुदाने देण्यात येतात. परंतु त्यातून उभे राहणारे वाद लक्षात घेता, त्यावर धोरण ठरले पाहिजे, अशी चर्चा गुरुवारी (दि. ७) महासभेत झाली. त्यानुसार आता धोरण ठरविले जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. वसंत व्याख्यानमालेस अनेक कारणांमुळे निधी न देण्याचा माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांचा निर्णय विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी कायम ठेवला आहे, तर व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी महापालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.नाशिक महापालिकेच्या वतीने अनेक संस्था अनुदानासाठी अर्ज करतात आणि महापालिकेला सामाजिक भावनेतून अनुदान देतही असते. परंतु विदेश दौरे, व्यावसायिक प्रदर्शने, चित्रपट इतकेच नव्हे तर अनेक व्यावसायिक संस्थादेखील महापालिकेकडे सामाजिक पार्श्वभूमी जोडून अनुदान मागत असतात. काही संस्था विशिष्ट उपक्रमासाठी निधी मागतात. परंतु काही संस्था तर वर्षानुवर्षे महापालिकेकडून अनुदान घेत आहेत. त्यामुळे अनुदान हा विषय नेहेमीच वादात सापडतो. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.७) झालेल्या महासभेत त्यावरून चर्चा झाली. यासंदर्भात धोरण ठरविण्याची आणि वाद टाळण्याची सूचना विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी केली आणि ती मान्यही करण्यात आली. दरम्यान, महापालिकेच्या वतीने सध्या वसंत व्याख्यानमालेला अनुदान रोखल्याचा वाद सुरू असून, त्यासंदर्भात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भूमिका कायम ठेवली आहे. संबंधित संस्थेस काही कारणावरून अनुदान नाकारण्यात आले होते आता एका माजी आयुक्तांचा निर्णय आपण कसा बदलणार? असा प्रश्न त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. व्याख्यानमालेस अनुदान देण्याच्या निर्णयाबाबत सकारात्मक होतो असे आपण कधीही बोललो नव्हतो, असे स्पष्ट करतानाच त्यांनी सदरची अनुदानाची फाइल पुन्हा एकदा अतिरिक्त आयुक्त फडोळ यांना तपासून घेण्यास सांगितले आहे, असेही गमे म्हणाले.दरम्यान, वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी स्थगित केलेले उपोषण शुक्रवारी (दि.८) सुरू केले. महापालिकेचे अनुदान आणि देणगीदारांच्या देणगीमधून व्याख्यानमाला सुरू असते. परंतु महापालिकेकडून अनुदान दिले जात नसून आयुक्तांनी सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते पाळले नाही त्यामुळे उपोषण सुरू करीत असल्याचे बेणी यांनी नमूद केले आहे.
अनुदानासाठी मनपा आता धोरण ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 1:12 AM
महापालिकेच्या वतीने विविध संस्थांना अनुदाने देण्यात येतात. परंतु त्यातून उभे राहणारे वाद लक्षात घेता, त्यावर धोरण ठरले पाहिजे, अशी चर्चा गुरुवारी (दि. ७) महासभेत झाली. त्यानुसार आता धोरण ठरविले जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
ठळक मुद्दे वसंत व्याख्यानमालेस गमे यांचा नकारच