नाशिक : खासगी कोरोना टेस्टिंग लॅबमध्ये शासकीय लॅबच्या तुलनेत जवळपास तिप्पट प्रमाणात अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याचे जिल्हा प्रशासनाला आढळले. त्याबाबत जिल्हा रुग्णालयाकडे फेरतपासणी केली असता, खासगीत पॉझिटिव्ह आलेल्या १६ नमुन्यांची तपासणी शासकीय लॅबमधून करून घेतली असता, त्यातील तब्बल ७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे खासगी लॅब पॉझिटिव्हचे आकडे जास्त दाखवत असल्याचे आढळले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दातार जेनेटिक्स लॅबला पुढील आदेश येईपर्यंत कोरोना स्वॅब टेस्टिंग करण्यास बंदी घातली आहे, तसेच याप्रकरणी शहरातील सुप्रीम डायग्नोस्टिकच्या नमुन्यांचादेखील फेरतपासणी अहवाल मागवून त्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्याचे तसेच ठाण्यातील तुर्भे येथील थायरोकेअर लॅबमधील अहवालाबाबत तेथील जिल्हा प्रशासनाकडून तपासणी करण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
गत काही दिवसांपासून शहर व जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाचा आकडा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासकीय लॅबपेक्षा खासगी लॅबमध्ये, स्वॅब टेस्टिंगमध्ये तुलनेने पाॅझिटिव्हचे आकडे जादा असल्याची चर्चा सुरू होती, तसेच खासगी लॅब कोरोना बाधितांचे आकडे फुगवून दाखवत असल्याचे बोलले जात होते. याप्रकरणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शासकीय व खासगी लॅबमधील आकडेवारीची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दातार जेनेटिक्स लॅबमधील स्वॅब टेस्टिंग केलेल्या रुग्णांची जिल्हा रुग्णालयाकडे फेरतपासणी केली असता १६ पैकी तब्बल ७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले, तसेच सुप्रीम डायग्नोस्टिक या लॅबचे पाॅझिटिव्ह रेटदेखील असेच मोठे असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर थायरोकेअर ही लॅब तुर्भे येथे असल्याने ठाणे येथील जिल्हाधिकाऱ्यांना स्वॅब टेस्टिंगची फेरतपासणीचे पत्र देण्यात आले असून, त्याबाबत पाठपुरावा करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले. या फेरतपासणीत दातार जेनेटिक्स दोषी आढळल्याने पुढील आदेश येईपर्यंत दातार लॅबमध्ये कोरोना स्वॅब टेस्टिंगवर बंदी घालण्यात आली आहे, तसेच दातार जनेटिक्स लॅब कायमस्वरूपी बंद करण्यात का येऊ नये, याबबत संबंधित कंपनीकडे खुलासा मागविण्यात आला आहे.
इन्फो
बाधित दरातील तफावत
शासकीय लॅबमध्ये पाॅझिटिव्हीटी रेट ७.८ टक्के असून दातार लॅब व थायरोकेअर लॅबमध्ये पाॅझिटिव्ह रेट २० टक्क्यांपेक्षा अधिक तर सुप्रीम डायग्नोस्टिकमध्ये पाॅझिटिव्ह रेट १८.७ टक्के आढळून आला. दऱम्यान स्वॅब तपासणी आयसीएमआर मार्गदर्शक तत्वाप्रमाणे झाली नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
इन्फो
परिस्थितीशी विसंगत आणि चुकीच्या अहवालामुळे रुग्णांचे आरोग्य व कोरोनाविषयक उपाय योजनांवर प्रतिकुल परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत दातार लॅबमध्ये कोरोना चाचणीस बंदी घालण्यात आली आहे. दातार लॅबने आयसीएमआरकडून उपलब्ध यंत्र सामग्रीची प्रमाणीकरण करून त्याचा अहवाल सादर करावा, तसेच लॅब कायमस्वरुपी बंद का करण्यात येऊ नये त्याबाबत दातार लॅबने जिल्हाप्रशासनाकडे खुलासा करणे बंधनकारक आहे.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी
इन्फो...
स्वेच्छेने चाचण्या बंद करणार
दातार जेनेटीक्स लॅबच्या वतीने करणाऱ्यात येणाऱ्या चाचण्या एनएबीएल व आयसीएमआर प्रमाणीत आहेत. तर आरटीपीसीआर चाचणीदेखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे येाग्य किटस वापरून अचुकपणे केल्याजात. कंपनीने तपासलेल्या काही नमुन्यांपैकी काही नमूने एनआयव्ही आणि आयसीएमआर यांच्याकडे पुनर्तपासणीसाठी पाठवले जातात. आजपर्यंत झालेल्या सर्व पुर्नतपासण्या शंभर टक्के बरोबर होत्या. यासंदर्भात जिल्हा प्रशासनास पत्र लिहून ठेवलेल्या नमुन्यांचे पुर्नपरीक्षण लॅबच्या खर्चाने एनआयव्हीमार्फत करून घ्यावे अशी विनंती केली आहे. त्यावर सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे; मात्र सद्यपरिस्थितीत कोविड १९ चाचण्या बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे लॅब व्यवस्थापनाने कळवले आहे.