नाशिक : दीड वर्षाच्या कोरोनाच्या दहशतीनंतर कोरोनाचे प्रमाण कमी होत असताना दिवाळीचा सण येत आहे. त्यामुळे जनतेच्या भावनांशी निगडित फटाकेबंदीच्या प्रस्ताव चुकीचा असल्याचे सांगत, महासभेत सर्वांनुमते विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सादर केलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे यंदा फटाके वाजवण्याची मुभा असणार आहे.
नाशिक महापालिकेची महासभा सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केवळ शासनाच्या वसुंधरा उपक्रमातील सहभाग म्हणून नाशिक विभागातच फटाके वाजवण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर फारशी चर्चा न करता हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. माझी वसंधुरा उपक्रमाअंतर्गत नाशिकच नव्हे तर विभागातील पाचही जिल्ह्यांतील महापालिका आणि नगरपालिकांना निर्णय घेऊन त्याबाबत २२ ऑक्टोबरपूर्वी अधिसूचना काढण्याचे आदेश गमे यांनी दिले होते. मात्र, हा प्रस्ताव इतका विलंबाने आला की त्यापूर्वीच महापालिकेने फटाक्यांच्या स्टाॅल्सचे लिलाव काढले होते तसेच व्यापाऱ्यांनीदेखील माल आणून ठेवला असताना ऐनवेळच्या या निर्णयामुळे महापालिकेतील सत्ताधिकाऱ्यांची अडचण झाली होती. गमे यांचा उद्देश चांगला असला तरी कोरोनाचा संकट आतासे कुठे संपत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकादेखील होऊ घातलेल्या असल्याने त्यावर निर्णय घेणे कठीण होणार होते. सर्वपक्षीयांनीच त्यास विरोध करण्याची भूमिका घेतली हेाती. मात्र, प्रत्यक्ष प्रस्ताव आला त्यावेळी चर्चा करण्यात फार वेळ न घालवताच हा विषय फेटाळला आहे.
इन्फो...
महापालिकेच्या स्टॉल्सचे लिलाव होणार
नाशिक शहरात एकूण ३० ठिकाणी महापालिकेने फटाक्यांचे स्टॉल्ससाठी लिलाव देण्याचे ठरविले हेाते. मात्र, विभागीय आयुक्तांच्या पत्राने अडचण झाली होती. मात्र, आता एकंदरच हा विषय मिटल्याने आता लिलावदेखील होणार आहेत.