नाशिक : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज्य विधीमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे सदस्य शुक्रवारी सकाळी रवाना झाले असले, तरी शासकीय कार्यालयांना समितीच्या अहवालाची धास्ती निर्माण झाली आहे. या दौऱ्यानंतर समिती विधीमंडळाला अहवाल सादर करणार असल्याने सर्वच शासकीय यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या बुधवारी सकाळी समिती सदस्य नाशिकमध्ये दाखल झाले होते. या तीनदिवसीय दौऱ्यात समितीने अनेक शासकीय कार्यालयांचा आढावा घेत झाडाझडती केली तर काही शासकीय कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देत गंभीर स्वरुपाचे आक्षेप नोंदविल्यामुळे समिती कशाप्रकारे अहवाल सादर करू शकेल, याविषयीची धास्ती शासकीय कार्यालयांमध्ये दिसून आली.
शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत समितीने अनेक आक्षेपार्ह कामांवर बोट ठेवत अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर ताशेरे ओढले तर केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीचा विनियोग करताना शासकीय कार्यालयांकडून अनावश्यक कामे घुसविल्याने स्पष्ट शब्दात नाराजीदेखील व्यक्त केली होती. विशेषत: स्मार्ट सिटीची कामे करताना मोठ्या प्रमाणात अवैध गौणखनिज उत्खनन झाल्याचा ठपका समितीने ठेवला आहे. त्यामुळे शासनाचे उत्पन्न बुडाले असल्याने याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली कामे खरोखरच स्मार्ट झाली आहेत का? असा प्रश्न समितीने उपस्थित करून अनेक कामांचा आढावा घेताना कामातील अनियमितता समोर आणली. स्मार्ट सिटीच्या कामांची रुपरेषा तसेच कागदपत्रांची छाननी समितीने केली असल्याने व उघडपणे दाखवलेल्या नाराजीमुळे स्मार्ट सिटीचे अधिकारीदेखील चिंतेत सापडले आहेत.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, उपनिबंधक कार्यालयातील कागदपत्रांची केेलेली पडताळणी तसेच ठक्करबाप्पा योजनेवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सुरू असलेली कामे आणि अपूर्ण योजनांबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत समिती सदस्यांची चांगलीच झाडाझडती घेतली असल्याने समिती विधीमंडळाकडे सादर करणाऱ्या अहवालाबाबत शासकीय अधिकाऱ्यांना धास्ती वाटत आहे. दरम्यान, समितीकडे काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी मतदार यादीतील दुबार नावांची तक्रारदेखील केली असल्याने हा सर्वात संवेदनशील मुद्दा समितीपुढे आला आहे. त्यामुळे याबाबत काय अभिप्राय दिला जातो, याबाबतही शासकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
--इन्फो--
सकाळी १० वाजताच रवाना
दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असल्याने या बैठकीकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, सकाळी दाखल झालेली समिती अवघ्या तासभराच्या आतच रवाना झाली. बैठकीचा औपचारिक समारोप झाल्यानंतर विधीमंडळाचे सदस्य मुंबईकडे रवाना झाले.