नाशिक : तोंडावर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी नेमण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त व विभागीय आयुक्तांना दिल्या असल्या तरी, अशा अधिकाऱ्यांच्या नेमणुका करताना घालून दिलेले निकष पाहता नाशिक जिल्ह्यात अधिकाऱ्यांची वानवा निर्माण झाल्याने त्यासाठी परजिल्ह्याची मदत घ्यावी लागणार आहे. राज्य आयोगाने काढलेल्या या आदेशात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची नेमणूक केली जावी असे नमूद करण्यात आले असून, अधिकाऱ्यांची कमतरता असेल तर विभागीय आयुक्तांनी अन्य जिल्ह्यांतून असे अधिकारी उपलब्ध करून द्यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अन्य जिल्ह्यांत अधिकारी नसतील तर इतर महापालिकेतील उपआयुक्तांची नेमणूक करण्यात यावी असा पर्याय राज्य आयोगाने खुला ठेवला आहे; मात्र निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकारी नेमताना त्यासाठी निकषही घालून दिले आहेत. स्थानिक जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक करू नये त्याचबरोबर तीन वर्षांपासून एकाच पदावर व जिल्ह्यात चार वर्षे सेवा झालेल्या अधिकाऱ्यांनाही नियुक्त करू नये अशा सक्त सूचना आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे आयोगाच्या निकषाचे पालन करून निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करणे मोठी तारेवरची कसरत होणार असून, गेल्याच आठवड्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांनी नाशिक जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेमणुका करतानाच, प्रतिनियुक्तीवरील उपजिल्हाधिकारी तसेच पर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्याही नेमणुका करून टाकल्या आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेसाठी निवडणूक अधिकारी नेमण्यासाठी जिल्ह्यात अधिकारीच उपलब्ध नाहीत, परिणामी अन्य जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
महापालिकेसाठी अधिकाऱ्यांची वानवा
By admin | Published: December 31, 2016 1:04 AM