अधिकाऱ्यांना हवी नाशिकच्या एस.टी.ची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:15 AM2021-09-03T04:15:44+5:302021-09-03T04:15:44+5:30
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नाशिकमध्ये येण्यासाठी ...
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नाशिकमध्ये येण्यासाठी अनेक अधिकारी तयारी करीत असल्याची चर्चा महामंडळाच्या वर्तुळात सुरू आहे. मुंबईपासून त जळगावपर्यंत अनेकांनी यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी यंदा या जागेवर महिला अधिकाऱ्याची निवड होण्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे.
नाशिकचे विभाग नियंत्रक पाटील हे गेल्या ३१ तारखेला सेवानिवृत्त झाल्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर अद्याप कुणाचीही निवड करण्यात आलेली नाही. विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांच्याकडे सध्या पदभार देण्यात आलेला आहे. या रिक्त झालेल्या जागेवर येण्यासाठी औरंगाबादचे विभाग नियंत्रक अरुण सिया हे इच्छुक असल्याचे समजते. सिया हे नाशिकमध्ये वाहतूक अधिकारी असताना औरंगाबादला विभाग नियंत्रक म्हणून दोन वर्षांपूर्वी रुजू झालेले आहेत. धुळे येथील मनीषा सपकाळ यादेखील नाशिकला येण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. सिया आणि सपकाळ हे नाशिकशी संबंधित असल्याने त्यांचा या जागेसाठी विशेष प्रयत्न सुरू आहे. त्याचप्रमाणे अकोला येथून चेतना पाटील यांच्यादेखील नावाची चर्चा होत आहे.
नाशिकमधीलच दोन अधिकारी देखील या पदासाठी आग्रही असल्याचे समजते. मात्र, व्यवस्थापकीय संचालकांच्या चौकशीचा फेरा मागे लागल्याने त्यांची नावे मागे पडली आहेत, तर एक अधिकारी टेक्निकल विभागाशी निगडित असल्यामुळे त्यांचे मनसुबे पूर्ण होण्याची शक्यता कमीच मानली जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी नाशिकचे असल्यामुळे स्वगृही परतण्यासाठी त्यांनीही प्रयत्न चालविले असल्यामुळे यंदा विभाग नियंत्रक पदासाठीची चुरस अधिक असल्याचे दिसते.