ओझरटाऊनशिप : आषाढी एकादशी निमित्त ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे बाणेश्वर महादेवास श्री विठ्ठल रु पात सजविण्यात आले होते. त्यामुळे प्रथमच भगवान बाणेश्वर महादेवाच्या शिवपिंडीत एकाच वेळी हरी-हर दर्शन झाले.संत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने ओझर येथे निर्माण करण्यात आलेले देवभूमी जनशांती धाम नाशिक जिल्ह्याचे वैभव ठरत आहे.या धामात अष्टविनायक, अष्टलक्ष्मी, अष्टमूर्ती शंकर यांसह एकूण ११७ शिवलिंगांची स्थापना करण्यात आली आहे. येथे शेकडो देवी-देवतांचेही अधिष्ठान आहे. येथील तब्बल ८१ फूट उंच असलेले हेमाडपंथी बाणेश्वर महादेव मंदिर आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. या मंदिराच्या चारही बाजूने पाण्याचे तळे असून येथे ठिकठिकांणी कारंजे बसविण्यात आले आहेत. सारा परिसर निसर्गरम्य असल्यामुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.जनशांती धाम परिसर सध्या विकासकामांसाठी बंद करण्यात आले आहे. मंदिरातील त्रिकाल पूजा मात्र विधीयुक्त पद्धतीने सुरू आहे. आषाढी एकादशी निमित्त जनशांती धामातील विठ्ठल-रु क्मिणी मूर्तीसह भगवान बाणेश्वर महादेवाचे विशेष महाअभिषेक पूजन संपन्न झाले.