जुने नाशिक : एकाच कुटुंबातील तीघांचा कोरोनाने घेतला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 04:38 PM2020-06-10T16:38:16+5:302020-06-10T16:46:53+5:30
नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा, फकिरवाडी, चव्हाटा, बागवानपुरा, काजीपुरा, जेगवाडा, मुलतानपुरा, बुधवारपेठ, काजी गढी, नानावली, कथडा, चौकमंडई हा सगळा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा व एकमेकांना लागून आहे.
नाशिक : शहरातील मधील नाईकवाडीपुरा या भागात कोरोनाचा अचानकपणे उद्रेक झाला. या भागातील एकाच कुटुंबातील तीघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामध्ये दोन सख्खे भाऊ आणि भावजयीचा समावेश आहे. नाईकवाडीपुरा-कुंभारवाडा भागात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या बुधवारी (दि.१०) पाच झाली.
शहराचा अत्यंत दाट लोकवस्तीचा गावठाण भाग म्हणून जुने नाशिकची ओळख आहे. या भागात अरुंद गल्लीबोळ आणि संमिश्र लोकवस्ती आहे. लहान-लहान घरे एकमेकांना अगदी लागूनच आहे. यामुळे या भागात झालेला कोरोनाचा शिरकाव जाणकारांच्यामते अधिक धोकेदायक ठरणारा असल्याचे बोलले जात आहे. नाईकवाडीपुरा, कुंभारवाडा, फकिरवाडी, चव्हाटा, बागवानपुरा, काजीपुरा, जेगवाडा, मुलतानपुरा, बुधवारपेठ, काजी गढी, नानावली, कथडा, चौकमंडई हा सगळा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा व एकमेकांना लागून आहे. सध्या नाईकवाडीपुरा भागात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले असले तरीदेखील अमरधामरोड, कुंभारवाडा, बागवानपुरा, मोठा राजवाडा, कोकणीपुरा, दुधबाजार, खडकाळी या भागातसुध्दा रुग्ण मिळून आले आहेत. यामुळे हा संपुर्ण जुने नाशिक परिसर एकूणच सध्या ‘रेड झोन’ बनला आहे, असे म्हणणे चुकीचे होणार नाही. या भागातील नागरिकांनी खूप जास्त प्रमाणात स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची गरज असून कुठल्याहीप्रकारे स्वत:चा आजार व लक्षणे लपवून न ठेवता डॉक्टरांसोबत संपर्क साधावा तसेच आरोग्यप्रशासनाच्या सर्वेक्षण पथकाला पुर्ण सहकार्य करणे गरजेचे असल्याचे महापालिकेचे कोरोना सेलप्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले.
अफवांना बळी पडू नये; गैरसमज पसरवू नये
जुने नाशिक भागात कोरोना आजाराविषयीचे विविध गैरसमज पसरत आहेत; मात्र आता ही वेळ गैरसमज पसरविण्याची आणि त्यावर विश्वास ठेवून अफवांना बळी पडायची अजिबात नाही, असे पोलीस व आरोग्य प्रशासनाने म्हटले आहे. मनपा आरोग्य प्रशासनासह पोलीस प्रशासन पुर्णपणे सतर्क राहून या भागात उपाययोजनांवर भर देत आहेत; मात्र नागरिकांनीदेखील घरात थांबण्यास व स्वयंशिस्त लावून घेत आरोग्याच्या बाबतीत पाळावयाच्या सुचना गांभीर्याने घेण्याची गरज आहे.