नाशिक : अत्यंत दाट लोकवस्ती आणि जुन्या नाशकातील गावठाण भाग असलेल्या जुन्या तांबट गल्लीतील एका बंद लाकडी जुन्या वाड्याला गुरुवारी (दि.४) दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानकपणे आग भडकली. बंद वाड्याच्या खिडकीमधून आगीच्या ज्वाला अन् धूराचे लोट बाहेर येऊ लागल्याचे दिसताच आजुबाजुच्या रहिवाशांनी अग्नीशमन दलाला घटनेची माहिती दिली. विविध अडथळ्यांची शर्यत पार करत अग्नीशमनच्या बंबासह जवान अवघ्या काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला.जुने नाशिक या भागात आपत्कालीन परिस्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा, या परिस्थितीचा सामना करताना विविध अडथळ्यांवर बचाव पथकाच्या जवनांना अगोदर मात करावी लागते. त्याचा प्रत्यय गुरुवारीही आला. जुनी तांबट गल्लीमध्ये सुनील जगदाने यांच्या मालकीच्या वापरात नसलेला जुना लाकडी वाडा आहे. या लाकडी वाड्यामध्ये अचानकपणे दुपारी आग लागली. आगीचे निश्चित कारण उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नव्हते; मात्र यापुर्वीही दोन ते तीन वेळा या वाड्यामध्ये अशाचप्रकारे आग धुमसली होती, अशी माहिती अग्नीशमन दलाच्या जवानांनी दिली. दुपारी आग लागल्याचा ह्यकॉलह्ण शिंगाडा तलाव येथील मुख्य अग्नीशमन दलाच्या मुख्यलयात आला. माहिती मिळताच जवानांनी कौशल्य आणि पुर्वानुभव लक्षात घेता अरुंद गल्लीबोळ आणि दाट लोकवस्तीमुळे ह्यदेवदूतह्ण या लहान बंबासह जवानांना तातडीने रवाना केले. अवघ्या काही मिनिटांतच सारडासर्कल, फाळकेरोड, दुधबाजार, शहीद अब्दुल हमीद चौकातून हा बंब घटनास्थळी पोहचला. यावेळी संपुर्ण वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला होता. वरील बाजूच्या खिडक्यांमधून बाहेर येणाऱ्या आगीच्या ज्वालांच्या दिशेने जवानांनी पाण्याचा मारा सुरु केला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दीही जमली होती.
..अर्ध्या तासात मिळविले आगीवर नियंत्रणआगीचे स्वरुप रौद्र असल्यामुळे तत्काळ अतिरिक्त मदत म्हणून दुसरा बाऊजर बंबासह जवानांनी कुमक घटनास्थळी बोलविण्यात आली. लिडिंग फायरमन इकबाल शेख, फारयमन राजेंद्र नाकील, तौसिफ शेख, भीमाशंकर खोडे, राजेंद्र पवार, शिवाजी फुगट, दिनेश लासुरे, अभिजीत देशमुख, अशोक सरोदे, जे.एस.अहिरे या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. कारण या वाड्याला लागूनच अन्य दुसरे वाडेही असल्यामुळे धोका मोठा होता. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.