सातपूर : औद्योगिक वसाहतीतील इलेक्ट्रिक वस्तू बनविणाऱ्या एका कारखान्यातील चांदीवर कंपनीतीलच कामगाराने डल्ला मारून सुमारे ७३ हजार रुपये किमतीचा माल चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित कामगारास बेड्या ठोकल्या आहेत.
सातपूर औद्योगीक वसाहतीतील निवेक क्लबसमोरील एक्सेल इंजिनिअरिंग कारखान्यातील हा चोरीचा गुन्हा घडला आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात कंपनीत काम करणाऱ्या राहुल संजय सूर्यवंशी (२८) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. राहुल सूर्यवंशी हा एक्सेल इंजिनिअरिंगमध्ये कामाला आहे. या कारखान्यात इलेक्ट्रिक वस्तूंचे स्पेअर पार्ट बनविले जातात. त्यात बहुतांश वस्तूमध्ये चांदीचा ॲनोड आणि कॅथोडचा वापर केला जातो. संशयित राहुल सूर्यवंशी याने शुक्रवारी (दि.११) रात्री कामावर असताना आपल्या ताब्यातील चांदीमधून सुमारे ७३ हजार रुपये किमतीची ९९४ ग्रॅम वजनाची ॲनोड हातोहात लांबविली. ही बाब लक्षात येताच कारखाना व्यवस्थापनाने सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. कंपनीतर्फे अविनाश खैरनार यांच्या तक्रारीवरून राहुल सूर्यवंशीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास हवालदार संजय शिंदे करीत आहेत.