नाशिक- लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत सकाळी कांदा लिलावात कमी भाव पुकारल्यानंतर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादकांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कांदा उत्पादकांनी कांदा लिलाव बंद पाडले. लासलगाव येथील कांदा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर कांदा आवक होती. सकाळी नऊ वाजता कांदा लिलाव सुरू झाले. परंतु सकाळी 1 हजार वाहनातील कांदा 1652 रूपये व सरासरी भाव 1400 रूपये कांदा भाव जाहीर होताच हे लिलाव बंद पाडण्यात आले. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट करून कांदा निर्यात बंदी उठवली. मात्र याबाबत नोटिफिकेशन निघाले नाही. यावर भारत दिघोळे यांनी तीव्र टीका करुन एका क्षणात कांदा बंदी केली जाते. परंतु केंद्रीय मंत्र्यांच्या ट्वीटला सहा दिवस झाले तरी शासन झोपलेले आहे. त्यामुळे खासदार भारती पवार, सुभाष भामरे व हेमंत गोडसे यांनी तातडीने लक्ष घालावे असे सुचवुन जोपर्यंत कांदा निर्यातबंदी उठवली जात नाही. तोपर्यंत नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार पेठेत कांदा विक्रीस आणणार नाही असे दिघोळे यांनी जाहीर केले.
नाशिकमधील कांदा लिलाव पाडले बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 11:29 AM