लासलगाव : गेल्या अनेक वर्षांपासून अमावास्येला बंद असलेल्या कांदा लिलावाबरोबरच प्रत्येक शनिवारी दिवसभर लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय मर्चण्ट्स असोसिएशनच्या सभासदांनी घेतला असल्याची माहिती दि लासलगाव मर्चण्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व बाजार समितीचे व्यापारी सदस्य नंदकुमार डागा यांनी दिली.
सध्या बाजार समितीच्या बाजार आवारांवर उन्हाळ (रब्बी) कांदा विक्रीस येत आहे. पुढील हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बांधवांना पैशांची आवश्यकता असल्याने अनेक शेतकरी बांधव त्यांच्याकडील कांद्याची विक्री करण्यासाठी घाई करीत आहे. परंतु गेल्या महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शासनाच्या आदेशानुसार बाजार समितीतील कांदा लिलाव साधारणतः २४ दिवस बंद होते. त्यामुळे शेतकरी बांधवांची कांदा विक्रीची निकड विचारात घेऊन परिसरातील शेतकरी बांधवांबरोबरच लासलगाव बाजार समितीच्या गेल्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून लासलगाव मर्चण्ट्स असोसिएशनच्या सभासदांनी अनेक दिवसांची परंपरा मोडीत काढीत येत्या अमावास्येपासून प्रत्येक अमावस्येला सकाळच्या सत्रात व प्रत्येक शनिवारी दिवसभर कांदा लिलाव सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. शेतकरी बांधवांनी त्यांचा कांदा हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून त्या दिवशी विक्रीस आणावा, असे आवाहन डागा यांनी केले आहे.लासलगाव मर्चण्ट्स असोसिएशनतर्फे सत्कारऐन पावसाळी हंगामात सोमवारी (दि.७) बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर ४९० ट्रॅक्टर व १,४४७ पिकअप अशा एकूण १,९३७ वाहनांमधून विक्रीस आलेल्या ३८ हजार २९६ क्विंटल कांद्याची लिलाव प्रक्रिया कमीत कमी वेळात पूर्ण केल्याबद्दल मंगळवारी (दि.८) लासलगाव मर्चण्ट्स असोसिएशनतर्फे सर्वात जास्त कांदा खरेदी करणारे खरेदीदार ओमप्रकाश राका, दत्तात्रय खाडे, सौरभ जैन, अनिल बांगर, रोशन माठा यांच्यासह बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, बाजार समितीचे सुनील डचके, दत्तात्रय होळकर, कांतिलाल आंधळे, चांगदेव देवढे, सचिन जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, नंदकिशोर साखला, दीपक चोपडा, अभय ब्रह्मेचा, नितीनकुमार जैन, मनोज शिंगी, डॉ.अविनाश पाटील यांच्यासह कांदा व्यापारी मनोज जैन, बाळासाहेब दराडे, प्रवीण कदम, प्रफुल्लकुमार भंडारी, संतोष माठा, राहुल बरडिया, सुरेश खुर्दे, संदीप गोमासे, मनीष सारस्वत, शंकर काळे, भास्कर डोखळे, नाना कोकणे, बाजार समितीचे प्रकाश कुमावत, सुशील वाढवणे, संदीप निकम, मनोज शेजवळ, गौरव निकम, वैभव वाघचौरे, गोरख विसे, रामदास गायकवाड, गणेश आहेर आदी उपस्थित होते.