लखमापूर : कांद्याचे दर गगनाला भिडल्यामुळे स्वयंपाक घरातून कांदा गायब होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता विविध हॉटेल व्यावसायिकांनी ग्राहक वर्गाला कांद्याऐवजी कोबी व मुळा यांना देण्यासाठी पसंती दिली आहे.
सध्या बाजारपेठेत कांद्याला ७० ते ११० रुपये किलो भावाने विकत घ्यावा लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जवळ जवळ सहा ते सात महिन्यापासून हॉटेल व्यवसायावर बंदीची कुऱ्हाड कोसळली होती. आता कुठे हॉटेल चालू करण्याला परवानगी मिळाली. त्यामुळे प्रवासीवर्गाकडून विविध खाद्यपदार्थांची मागणी वाढली आहे. परंतु विविध भाज्यांना चव आणण्यासाठी कांद्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे ते ग्राहकवर्गाला देणे परवड नसल्याचे व्यावसायिक वर्गातून बोलले जात आहे.ग्राहक वर्गातून पावभाजी, शेवभाजी, पुरीभाजी, दाबेली, पोहे, मिसळपाव इ.साठी कांद्याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. तसेच कांदा कापून ग्राहकवर्गाला जेवणाबरोबर दिला जातो. परंतु सध्या कांदा विकत घेणे अवघड झाल्याने ग्राहकांच्या सेवेतून कांदा हद्दपार झाल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे आता विविध हॉटेलमध्ये कांद्याची जागा कोबी व मुळ्याने घेतली आहे. आता तर कांद्याबरोबर कोबीचेही भाव वाढलेले दिसत आहे. त्यामुळे कांदा खाणाऱ्या ग्राहकवर्गातून नाराजीचे सूर निघत आहे.सध्या बाजारात नवीन कांद्याला ४० ते ६० रुपये किलो, तर जुन्या कांद्यासाठी प्रतिकिलो ६० ते ८० रुपये भाव मोजावा लागत आहे. तर सर्वसाधारणपणे किरकोळ बाजारात कांद्याला ८० ते ११० रुपये प्रतिकिलो भावाने खरेदी करावा लागत आहे. निर्यातबंदीच्या काळात काहीअंशी कांद्याचे भाव कमी झाले होते. परंतु किरकोळ बाजारात कांद्याचे भाव मागे आलेच नसल्यामुळे ग्राहक वर्गाने कांदा खरेदीला नापसंती दाखविली हे चित्र पाहायला मिळाले होते.(फोटो २९ लखमापूर १)