सिडको : सुमारे चार लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयांतर्गत सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस गेल्या दोन महिन्यात केवळ पंचवीस हजार नागरिकांनाच देण्यात आला आहे. लस उपलब्ध होत नसल्याचे कारण असो की मनपाची उदासीनता; परंतु दोन महिन्यांत साधारणपणे फक्त १५ टक्केच नागरिकांचे लसीकरण झाल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेच्या सिडको कार्यालयांतर्गत सिडकोसह गोविंदनगर, सद्गुरुनगर, कामटवाडे, अंबड परिसर, पाथर्डी फाटा आदी भागांचा समावेश येतो. या भागातील लोकसंख्येचा विचार केला तर सुमारे साडेतीन ते चार लाख इतकी लोकसंख्या आहे. या लोकसंख्येच्या तुलनेत कोरोना प्रतिबंधक लस ही गेल्या दोन महिन्यात अनेक नागरिकांना दिली जाणे गरजेचे होते; परंतु आजपर्यंत केवळ २४ हजार १९७ इतकीच लस नागरिकांना दिल्याचे मनपाच्या आकडेवाडीवरून दिसून येत आहे. महापालिकेच्या वतीने जुने सिडको, मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालय, हेडगेवार चौक, अंबड येथील महालक्ष्मी समाजमंदिर, पिंपळगाव खांब आदी पाच ठिकाणी लसीकरणासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व केंद्रांवर २५,१९७ नागरिकांचे लसीकरण झाले असल्याचे मनपाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत केवळ १५ ते १६ टक्के इतकेच लसीकरण झाले आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीला सुरुवात झाली त्यावेळेस नागरिकांचा प्रतिसाद अल्पसा होता. मात्र काही दिवसांनंतर प्रत्येक लसीकरण केंद्रावर नागरिकांची सकाळपासूनच गर्दी दिसत होती. विशेष म्हणजे या लसीकरण मोहिमेत ज्येष्ठ नागरिकांसह महिला व तरुण महिलांचाही समावेश मोठ्या प्रमाणात दिसून आला. परंतु गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक लसीकरण केंद्रावर शंभर ते दोनशे इतकेच डोस उपलब्ध होत असल्याने नागरिकांना अनेकदा माघारी फिरावे लागत आहे.
चौकट===
केंद्रनिहाय लसीकरण
* जुने सिडको- ५७५९
* श्री स्वामी समर्थ रुग्णालय- ४२६०
* हेडगेवार चौक- ४६३७
* महालक्ष्मीनगर- ४६५७
* पिंपळगाव खांब- ५१८४