गंगापूर : नाशिक तालुका पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या गंगापूर धरणाजवळील दुगाव पोलीस चौकीचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. या चौकीच्या माध्यमातून परिसरातील गुन्हेगारी व अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येण्याची अपेक्षा होती. मात्र या पोलीस चौकीला कर्मचारी मिळत नसल्याने या चौकीची स्थापना झाल्यापासून आजतागायत ही चौकी कुलूपबंद असून, तिच्यावर परिसरातील मोकाट श्वानांकडून पहारा दिला जात आहे.गंगापूर धरण परिसरातील सुरक्षा, भुरट्या चोऱ्या, तसेच दुगाव, महादेवपूर आणि यशवंतनगर भागातील नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी धरण परिसरात ८ महिन्यांपूर्वी नाशिक तालुका पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या दुगाव पोलीस चौकीचे उद्घाटन तत्कालीन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांच्या हस्ते व विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तेव्हापासून ते आजपर्यंत या पोलीस चौकीला पूर्णवेळ पोलीस कर्मचारी मिळू शकला नसल्याने ती कुलूपबंद स्थितीत आजही आहे.नाशिक तालुका पोलीस ठाण्यांतर्गत मोडणाºया या पोलीस चौकीसाठी पोलीस निरीक्षकांकडूनच दुर्लक्ष केले जात असल्यामुळे या भागातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे कठीण होऊन बसले आहे. एकूण कर्मचाऱ्यांपैकी निम्मे या महिला कर्मचारी असल्याने त्यांना महत्त्वाच्या जबाबदाºया देता येत नाहीत, त्यामुळे पोलीस कर्मचाºयांनाच बरेचशी कामे करावी लागतात. अपुरे बळ असल्यामुळे चौक्यांवर नेमणुकीसाठी कर्मचारी अपुरे पडत आहेत. त्यामुळे चौक्यांना कुलपे ठोकण्यात आली असून, या चौकीचा मोकाट श्वानांनी आश्रय घेतला आहे.
दुगावच्या पोलीस चौकीला केवळ श्वानांचा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:21 AM