भालेकर मैदानावर यंदा एकच गणपती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:16 AM2021-09-11T04:16:50+5:302021-09-11T04:16:50+5:30
नाशिक : नाशिक जिल्ह्याचे गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या बी.डी. भालेकर मैदानावर यंदाच्या वर्षीदेखील सर्व मंडळे मिळून एकच गणपती बसविण्याचा ...
नाशिक : नाशिक जिल्ह्याचे गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या बी.डी. भालेकर मैदानावर यंदाच्या वर्षीदेखील सर्व मंडळे मिळून एकच गणपती बसविण्याचा निर्णय घेत केवळ एकाच गणरायाची प्रतिष्ठापना केली. सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आरोग्य शिबिरांचा जागर करण्यात येणार आहे.
भालेकर मैदानावर यंदा कुठल्याही स्वरूपाचा देखावा, विद्युत रोषणाई, ध्वनिप्रदूषणचा गाजावाजा न करता अत्यंत साध्या स्वरूपात एकच गणपती बसविण्याचा निर्णय झाल्याची माहिती मंडळाचे पदाधिकारी गणेश बर्वे व पद्माकर गावंडे यांनी दिली. देखावे नसल्याने गेल्या अनेक वर्षांची परंपरा खंडित होऊन गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. मात्र, जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच नाशिक शहरात वाढत असलेली चिकनगुन्या, डेंग्यू, मलेरिया, टायफाइड या आजारांची रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. भालेकर मैदानावर दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता या सर्व व कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी एचएएलचे हेमंत तेलंगी, महिंद्रा सोनाचे राजेंद्र खैरनार, राजे छत्रपतीचे दर्शन कुलकर्णी, राहुल बर्वे, नरहरी राजाचे गौरव बिरारी, मूकबधिरचे सुशांत गालफाडे, यशवंतचे कमलेश परदेशी, मायकोचे संजय पाटील, महिंद्राचे प्रसाद शुक्ल, प्रसाद पंडित आदी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
इन्फो
आरोग्याचा जागर
नाशिककर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य शिबिराचा व पर्यावरणाचा जागर होणार आहे. त्यामध्ये रक्तदान शिबिर, नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने कोरोना अँटिजेन टेस्ट, कोरोना लसीकरण, एसएमबीटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वरोगनिदान शिबिर व उपचार शिबिरामध्ये उंची, वजन, रक्तदाब, शुगर, ब्लड ऑक्सिजन तपासणी, ईसीजी, पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांसाठी ॲन्जिओग्रोफी,ॲन्जिओप्लास्टी व हृदय फिट पॅकेजअंतर्गत सवलतीच्या दरात ईसीजी टूडी इको तपासणी, नेत्र तपासणी शिबिर, वृक्षारोपण, गरजूंना अन्नधान्य वाटप, मास्क वाटप, औषधे वाटप, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप इत्यादी सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.