गुन्हेगारांच्या उघडल्या फाइल्स
By admin | Published: January 23, 2017 12:34 AM2017-01-23T00:34:04+5:302017-01-23T00:34:20+5:30
सतर्क : गत महापालिका निवडणुकीतील ४५ जणांवर कारवाई
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याबरोबरच सतर्क रहा, कोणाचाही दबावास न जुमानता कडक कारवाई करा, अशी तंबी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंघल यांनी रविवारी तातडीने घेतलेल्या बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या़ प्रशासकीय कामानिमित्त मुंबईला गेलेल्या आयुक्तांनी नाशकात परतताच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गुन्हेगारीचा आढावाही घेतला़ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून पाच दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केलेल्या सुरेंद्र शेजवळ या युवकाची शुक्रवारी (दि़२०) रात्री अज्ञात चार-पाच संशयितांनी निर्घृण हत्त्या केली़ ही हत्त्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे सांगितले जात असले तरी यातील एकाही संशयितापर्यंत पोलीस अद्याप पोहोचू शकलेले नाहीत़ तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका इच्छुक उमेदवाराची हत्त्या झाल्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाबरोबरच दहशत पसरली आहे़ पोलीस आयुक्त सिंघल हे गत दोन दिवसांपासून प्रशासकीय कामानिमित्त मुंबईला गेले होते़ सायंकाळी नाशिकमध्ये परतताच त्यांनी पोलीस उपायुक्तांसह, सहायक पोलीस आयुक्तव वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तातडीची बैठक घेतली़ या बैठकीत पोलीस ठाणेनिहाय गुन्हेगारांची माहिती घेऊन शहरातील राजकीय परिस्थितीवर बारकाईने लक्ष्य ठेवण्याच्या सूचना दिल्या़ तसेच येत्या दोन दिवसांत प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बाजावून गंभीर गुन्ह्यातील आरोपींना स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले़
महापालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे तसेच प्रस्ताव तयार करण्यात आलेल्या तडीपार गुन्हेगारांवर लक्ष ठेवून प्रस्ताव मंजूर होताच याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देत कोणाच्याही दबावाला बळी न पडता कारवाई करण्याचे आदेश दिले़ या बैठकीस गुन्हे शाखेचे उपायुक्त दत्तात्रय कराळे, परिमंडल एकचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, परिमंडल दोनचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, डॉ. राजू भुजबळ, सचिन गोरे, अतुल झेंडे, विजयकुमार चव्हाण यांच्यासह गोपनीय, सायबर शाखेसह शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)