मुंबई येथील एका जागेच्या वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने खुल्या जागेवर बांधकाम करण्यास मनाई केली. त्याचा आधार घेऊन नाशिक महापालिकेतदेखील खुल्या जागांवरील बांधकामे बंद करण्यात आली. चालू असलेली कामे वगळता अन्यत्र कामे करण्यास मनाई करण्यात आली आणि त्यानुसार सारेच प्रस्ताव राेखण्यात आले आहेत. त्यामुळे खुल्या जागेत समाजमंदिरे, व्यायामशाळा आणि अन्य कामे करण्यास अडचण निर्माण झाली आहे. नगरसेवकांमध्येदेखील नाराजी आहे. यासंदर्भात शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते आणि गटनेता विलास शिंदे यांनी बुधवारी (दि.६) आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेऊन निवेदन दिले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महापालिकेचे वकील एम. एल. पाटील यांनी कायदेशीर सल्ला दिला असून, त्यानुसार हे आदेश महापालिकेला लागू हेात नसतानादेखील कामे थांबवण्यात आली आहेत. तरी कायदेशीर तरतुदीनुसार ही कामे त्वरित करावीत, अशी मागणी शिवसेनेने केली असून, आयुक्त जाधव यांनीदेखील त्वरित याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने कोंडी फुटण्याची शक्यता आहे.
----छायाचित्र आर फेाटोवर ०७ अेापन स्पेस संदर्भातील बांधकामांचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन देताना शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर,अजय बोरस्ते व विलास शिंदे