प्रशासनाचाही विरोध, पण महापौर बीओटीवर ठाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 12:27 AM2021-08-06T00:27:16+5:302021-08-06T00:28:10+5:30
शहरातील बारा मोक्याचे भूखंड बीओटीवर विकसित करण्यासाठी देण्याच्या प्रस्तावावरून वादंग सुरू झाले असून, आता प्रशासन देखील असे प्रस्ताव गुंडाळण्याच्या तयारीत असताना महापौर सतीश कुलकर्णी यांनी मात्र आक्रमकपणे त्याचे समर्थन केले आहे. जगाने स्वीकारलेले बीओटीचे तत्त्व वापरण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या देखील सूचना असताना विरोधकांनी त्याला अडवण्यामागे कोणता हेतू दडला आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
नाशिक- शहरातील बारा मोक्याचे भूखंड बीओटीवर विकसित करण्यासाठी देण्याच्या प्रस्तावावरून वादंग सुरू झाले असून, आता प्रशासन देखील असे प्रस्ताव गुंडाळण्याच्या तयारीत असताना महापौर सतीश कुलकर्णी यांनी मात्र आक्रमकपणे त्याचे समर्थन केले आहे. जगाने स्वीकारलेले बीओटीचे तत्त्व वापरण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या देखील सूचना असताना विरोधकांनी त्याला अडवण्यामागे कोणता हेतू दडला आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
बीओटीवर १२ भूखंड विकासकांना देण्यावरून महापालिकेत वादंग सुरू असून, महासभेत चर्चा न करता मंजूर करण्यात आलेला ठराव तसेच निविदा न काढताच सल्लागार संस्थेची नियुक्ती, असे अनेक प्रश्न अडचणीत आणणारे असल्याने आयुक्त कैलास जाधव यांनीही त्याचा फेरविचार सुरू केला आहे. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी आक्रमकपणे या प्रस्तावाचे समर्थन सुरू केले आहे.
शहरातील बी.डी. भालेकर असो अथवा महात्मा फुले मंडई असो या वास्तू जीर्ण झाल्या असून, त्यांची आयुर्मर्यादा संपल्याने आता पुन्हा त्यांच्या निर्मितीसाठी इतका खर्च करणे महापालिकेला परवडणारे नाही. त्यामुळे बीओटीवर विकास करून ५० टक्के जागा विकासकाला तीस वर्षे कराराने देऊन उर्वरित जागा महापालिकेच्या कामासाठी दिले तर बिघडले कोठे, असा प्रश्न महापाैरांनी उपस्थित केला आहे. या प्रकल्पांमुळे महापालिकेला वार्षिक शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार असून वीस ते बावीस हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. हा प्रस्ताव प्रशासनाने देखील कायदेशीरदृष्ट्या तपासून मगच त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे, असा टोलाही महापौर कुलकर्णी यांनी आयुक्त कैलास जाधव यांना लगावला आहे.
इन्फो..
मनपाच्या पूर्व विभागाची इमारत पाडण्यात आली आहे. त्यामुळे द्वारकावरील जागेत व्यापारी संकुलाबरोबरच पूर्व विभागीय कार्यालय बांधण्यात येणार आहे. सातपूर येथेही अशाच प्रकारे विभागीय कार्यालय बांधण्यात येणार असून रुग्णालय, यशवंत मंडई तसेच सिडकोतील पेलीकन पार्क येथे बहुमजली वाहनतळ देखील विकसित करण्यात येणार आहे, असेही महापौरांनी नमूद केले आहे.
कोट...
राजीव गांधी भवन हे पवित्र मंदिर
राजीव गांधी भवन हे पवित्र आणि जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. विकासकाची गंगा तेथून सुरू होते. नागरिकांच्या समस्या येथे सोडवल्या जातात. असे भवन विकण्याचा विचार केवळ विरोधकांच्या मनात येऊ शकतो, माझ्या नाही. सवंग प्रसिद्धीसाठी असे आरोप करण्यात येत आहेत.
- सतीश कुलकर्णी, महापौर