शेतजमीन मूळ मालकाला परत करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 12:30 AM2021-03-07T00:30:28+5:302021-03-07T00:30:49+5:30
देवळा : बनावट मुद्रांक बनवून झालेल्या शेतजमीन खरेदीची नोंद रद्द करून याबाबतचा अंमल सातबारा सदरी तात्काळ घेण्यात यावा, असे आदेश चांदवडचे उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी दिले असून बनावट दस्तऐवजाद्वारे हडप केलेली शेतजमीन मूळ मालकाला परत मिळणार आहे.
देवळा : बनावट मुद्रांक बनवून झालेल्या शेतजमीन खरेदीची नोंद रद्द करून याबाबतचा अंमल सातबारा सदरी तात्काळ घेण्यात यावा, असे आदेश चांदवडचे उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी दिले असून बनावट दस्तऐवजाद्वारे हडप केलेली शेतजमीन मूळ मालकाला परत मिळणार आहे.
तिसगाव येथील भास्कर धर्मा निकम ह्या शेतकऱ्याची मेशी शिवारातील वडिलोपार्जीत शेतजमीन मिळकत नं ४००/१ (क्षेत्र - ३ हेक्टर ७०.आर ) बनावट दस्तऐवज तयार करुन घेवून बापू वाघ यांच्या नावे करण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात भास्कर निकम यांचे वडील धर्मा त्र्यंबक निकम यांचे निधन झाल्यानंतर वडिलोपार्जित जमिनीवर वारस नोंद लावण्यासाठी मेशी येथील तलाठी कार्यालयात गेले असता एका खरेदी खताच्या दस्तान्वये वडिलांच्या मिळकतीवर बापू वाघ ह्या व्यक्तीची महसूल दप्तरी मालकी हक्काची नोंद लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती त्यांना मिळाली.
सन २०१२ मध्ये त्यांच्या शेत जमीनीची विक्री झाल्याचे समोर आलेल्या दस्तऐवजा वरून दिसून आले. हया संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून चांदवडचे उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी शुक्रवारी (दि. ५ ) दिलेल्या आदेशात सदर मेशी येथील मिळकतीचा ( गट नं. ४ङ्म० / १ ) दुय्यम निबंधक कार्यालय देवळा येथील अभिलेखात नोंदणी झाल्याचा कोठेही उल्लेख येत नाही. यावरून सदर दस्त हा बनावट असल्याचे सिद्ध होत असल्याने रद्द होण्यास पात्र असून शेतजमीनीची खरेदी रद्द करून याबाबतचा अंमल सातबारा सदरी तात्काळ घेण्याचा आदेश दिला आहे.
माझ्या अज्ञानाचा फायदा घेऊन माझी जमीन लाटण्याचा प्रयत्न झाला, परंतु माध्यमांनी या विषयाला वाचा फोडली. माझी हडप झालेली जमीन मला पुन्हा परत मिळाल्यामुळे आनंद झाला आहे. ह्या प्रकरणातील दोषींना कडक शासन मिळावे.
- भास्कर धर्मा निकम, शेतकरी, तिसगाव.