नाशिक : शीख संप्रदायाचे आराध्य दैवत संत गुरुगोविंदसिंग यांच्या ३५०व्या जयंतीनिमित्त सरहद या संस्थेतर्फे पुणे येथे ‘विश्व पंजाब साहित्य संमेलन नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आल्याची माहिती संत सिंग मोखा यांनी मंगळवारी (दि. २७) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पुणे येथे दि. १८ नोव्हेंबर ते दि. २० नोव्हेंबर या कालावधीत स्वारगेट येथील गणेश कला, क्रीडा केंद्र येथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आहे. तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या या पंजाब संमेलनाचे अध्यक्ष थोर साहित्यिक आणि ज्येष्ठ पंजाबी कवी सुरजितसिंग पातर भूषविणार असून, या संमेलानात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. गेल्यावर्षी घुमान (पंजाब) येथे झालेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मराठी साहित्य संमेलनाबरोबरच पंजाबी साहित्य संमेलन महाराष्ट्रात घेण्यात यावे, अशी सूचना केली होती. याच पार्श्वभूमीवर सरहद संस्थेतर्फे पुण्यात या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.पुण्यात होणाऱ्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनामुळे पंजाब आणि महाराष्ट्राचे नाते आणि संघटन अधिकाधिक दृढ होणार असून, ‘मराठी भाषेचा भारतीय भाषांसाठी पुढाकार’ अशी संकल्पना डोळ्यासमोर ठेवून विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे आयोजन यशस्वी करण्याचा तसेच राष्ट्रीय एकात्मता टिकविण्याच्या दृष्टीने माणसा माणसांमध्ये समन्वय साधून माणूस जोडणे हे या साहित्याचे महत्त्वाचे कार्य असून, या माध्यमातून राष्ट्र, प्रांत, देश आणि भाषा जोडण्याचे अलौकिक महान कार्य आणि देश विकसित करण्याच्या दृष्टीने विविध भाषांचे संमेलन हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे बहुभाषिक साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष अरुण नेवासकर यांनी यावेळी सांगितले.नाशिक येथून संमेलनासाठी जाणाऱ्या बांधवांची अशोकस्तंभ येथील बारा बलुतेदार संघ कार्यालयात नोंदणीची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. वडाळा-पाथर्डी रोड येथील गुरूगोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस चरजितसिंग सहाणी, हरमिंदरसिंग घई, आर. पी. सहंगल, दलजितसिंग रॅक, अवतारसिंग चौके, उपमहापौर गुरुमित बग्गा आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुणे येथे विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचे आयोजन
By admin | Published: September 28, 2016 12:59 AM