जप्त केलेल्या ५५ वाहनांच्या मालकांचा घेतला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 08:24 PM2021-01-11T20:24:27+5:302021-01-12T01:26:57+5:30
ओझरटाऊनशिप : ओझर पोलीस ठाणे हद्दीत बेवारस स्थितीत आढळून आलेल्या तसेच विविध गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी व चारचाकी वाहने पोलीस ठाणे आवारात बकाल अवस्थेत पडून होती. ओझर पोलिसांनी त्यातील ५५ वाहनांच्या मालकांचा शोध लावला असून त्यापैकी ९ वाहन मालकांनी ओळख पटविल्यानंतर ओझर पोलिसांनी ती वाहने त्यांच्या ताब्यात दिली आहेत. उर्वरित वाहन मालकांनी त्यांची वाहने ओळख पटवून घेऊन जावीत अन्यथा या बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले.
ओझर पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक वर्षांपासून पडून असलेल्या बेवारस व विविध गुन्ह्यांतील ५५ वाहनांच्या मालकांचा शोध घेऊन संबंधित मालकांना वाहन घेऊन जाण्याबाबत कळविले होते. पैकी ९ वाहन मालकांनी त्यांच्या वाहनांची ओळख पटविल्यानंतर त्यांची वाहने त्यांच्या ताब्यात दिली आहेत.
बऱ्याच दिवसांपासून अपघातग्रस्त व विविध गुन्ह्यांतील दुचाकी व चारचाकी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात पडून होती. त्यांच्या वाहनांचे मालक सापडत नव्हते म्हणून ओझर पोलीस ठाण्याने या वाहन मालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसह निवडक पोलिसांची नियुक्ती करून ५५ बेवारस वाहनांचा शोध लावला आहे. यासाठी पोलीस नाईक देवराम खांदवे, दुर्गा खाने, बाळासाहेब पानसरे, अनुपम जाधव, नितीन कारंडे आदी पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले.